सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : पुण्यातील कोथरूड भागातील शिंदे चाळ परिसरामध्ये गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली होती, या गोळीबाराच्या घटनेमध्ये आता नवीन माहिती समोर आली आहे. सुरूवातीला एकावर गोळीबार झाल्याचं समजलं होतं. मात्र एक नाहीतर दोघांवर हा हल्ला झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. एकावर गोळी चालवली त्यासोबतच दुसऱ्यावर कोयत्याने हल्ला केल्याचं समजत आहे. हे गुन्हे कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ टोळीच्या सदस्यांनी केले आहेत. याप्रकरणी आता न्यायालयाने घायवळ टोळीच्या सदस्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींचे गुन्ह्यात आणखी कोण साथीदार आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत.
मयूर गुलाब कुंबरे, मयंक विजय व्यास, गणेश सतीश राऊत, दिनेश राम फाटक व आनंद अनिल चादळेकर अशी पोलिस कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी केलेल्या गोळीबारात आकाश मधुकर धुमाळ (वय ३६, रा. कोथरूड) हा जखमी झाला, तर कोयत्याच्या हल्यात वैभव तुकाराम साठे (वय १९, रा. सागर कॉलनी, कोथरूड) हा जखमी झाला आहे. याप्रकरणात कोथरूड पोलिसांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.
गुरूवारी मध्यरात्री आरोपी दुचाकीने त्यांच्या मित्राला सोडविण्यासाठी आले असताना रस्ता न दिल्यावरून वाद झाला होता. या वादानंतर आरोपींनी पिस्तूलातून गोळीबार केला. नंतर अवघ्या दोनशे मिटरवर उभा असलेल्या मुलांशी वाद घालत वैभव साठे या तरुणावर कोयत्याने वार केले होते. याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले. आरोपींचा गुन्हा करण्याचा उद्देश काय होता, त्यांचे इतर कोण साथीदार आहेत, तसेच गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त करायचे असून, ते त्यांनी कोठून आणले यासंदंर्भाने तपास करायचा असल्याने त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. न्यायालयाने आरोपींना २५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास कोथरूड पोलिस करत आहेत.
पुण्यात गुन्हेगारी वाढली
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. आंदेकर आणि कोमकर कुटुंबातील वाद आणि त्यामुळे होणारे गुन्हेगारी घटना शांत होत नाहीत तोपर्यंत आणखी एका ठिकाणी गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकारम समोर आला आहे. पुण्यातील नाना पेठेत 19 वर्षीय आयुष कोमकरची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. यामध्ये त्याच्यावर 12 गोळ्या झाडल्या ज्यापैकी 9 गोळ्या या त्याच्या पोस्टमार्टम वेळी काढण्यात आल्या. वर्षभरापूर्वी वनराज आंदेकरचा खून करण्यात आला. या घटनेचा बदला म्हणून गणेश आंदेकरच्या मुलाला आयुषला गोळ्या झाडण्यात आला. या घटनेत पोलिसांचा तपास सुरु असतानाच पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा प्रकार कोथरुडमधून उघडकीस आला आहे.