भाईंदर/ विजय काते : धुळवडीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना ही मद्यधुंद तरुणांनी पोलिसावरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना भाईंदरमध्ये घडली आहे. भर रस्त्यात सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस हवालदारावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
शुक्रवारी दुपारी भाईंदर पश्चिमेतील शिवसेना गल्ली परिसरात दोन तरुण रस्त्यातच वाद घालत होते. त्या भागात गस्त घालत असलेले पोलीस हवालदार काशिनाथ भानुसे यांनी हा वाद मिटवण्यासाठी हस्तक्षेप केला. मात्र, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असताना त्यातील एका तरुणाने भानुसे यांना जोरदार धक्का दिला, तर दुसऱ्याने खिशातून चाकू काढून त्यांच्या पोटावर वार केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे भानुसे गंभीर जखमी झाले. हल्ला करून दोन्ही तरुण घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी तातडीने जखमी पोलिसाला खासगी रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच भाईंदर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने काही तासांतच आरोपींचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी कमलेश गुप्ता आणि दिलीप खडक या दोन आरोपींना अटक केली.
भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी हल्ल्यावेळी मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी कोणत्याही कारणाशिवाय पोलिसावर हल्ला केला.या घटनेमुळे पोलीस दलात संतापाची भावना असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांवरच हल्ला होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांवर कडक कारवाई न झाल्यास भविष्यात गुन्हेगारीला अधिक चालना मिळू शकते. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा विरोध करावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.