सतीश वाघ हत्या प्रकरण (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: विधानसभेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा व व्यवसायिक सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून लष्कर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. एक हजार पानांच्या या आरोप पत्रात वाघ यांच्या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर आणि वाघ यांची पत्नी माेहिनी असल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे. वाघ यांचा खून करण्यापूर्वी पत्नी माेेहिनी हिने एका महिला मांत्रिकाची भेट घेतली होती. पती सतीश यांच्यावर जादुटोणा करण्यास मांत्रिकाला सांगितले होते, असे दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
सतीश तात्याबा वाघ (वय ५८, रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांचे अपहरण करुन निर्घृण खून करण्यात आल्याची घटना ९ डिसेंबर २०२४ राेजी घडली होती. गेल्या वर्षी सकाळी वाघ फिरायाल निघाले होते. सासवड रस्त्यावर त्यांना धमकावून त्यांचे कारमधून अपहरण केले. उरळी कांचन येथील शिंदवणे घाटात वाघ यांच्यावर शस्त्राने तब्बल ७२ वार करून खून केला होता. त्यांचा मृतदेह घाटात फेकून आरोपी पसार झाले होते. याप्रकरणात सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी, अक्षय जावळकर, आतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे यांना अटक करण्यात आली.
या प्रकरणात अटक केलेल्या सहा आरोपींवर गुन्हे शाखेने १ हजार पानांचे आरोपपत्र लष्कर न्यायालयात दाखल केले. माेहिनी वाघ व अक्षय जावळकर हे २०१३ मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले. अक्षय हा वाघ यांच्या खोलीत भाडेतत्त्वावर राहत होता. अक्षयने वाघ यांच्या मुलाला महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यास प्रयत्न केले होते. अक्षय आणि पत्नी मोहिनी यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. याचा सतीश वाघ यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी पत्नी माेहिनी हिच्याकडील आर्थिक व्यवहार काढून घेतले. नंतर अक्षयने दुसरीकडे घर घेतले. अक्षय आणि मोहिनी यांनी संगनमत करुन वाघ यांचा खून करण्याचा कट रचला.
याप्रकरणात पोलिसांनी न्यायवैद्यकीय पुरावे गोळा केले, तसेच आरोपी, तक्रारदार, साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. वाघ यांचा मोबाइल, गुन्ह्यात वापरलेली कार, शस्त्रे जप्त करण्यात आली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने तपास करुन आरोपपत्र दाखल केले.
पोलिसांनी सांगितले की, ५५ वर्षीय सतीश वाघ यांचे ९ डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातून अपहरण करण्यात आले होते. नंतर त्याची हत्या करण्यात आली. पुणे शहरातील हडपसर परिसरातील शेवाळवाडी चौकाजवळ त्यांना कारमध्ये नेण्यात आले. त्याचा मृतदेह जिल्ह्यातील पुणे-सोलापूर महामार्गावरील यवतजवळ अपहरण स्थळापासून 40 किमी अंतरावर आढळून आला.
सुमारे दीड वर्षांपूर्वी सतीश वाघ यांना दोघांवर संशय आला. एके दिवशी त्याने दोघांना रुममध्ये एकत्र पकडले आणि त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. मात्र, बदनामीच्या भीतीने सतीशने कोणतीही कारवाई केली नाही आणि अक्षयच्या कुटुंबीयांना इशारा देत घर रिकामे करण्यास सांगितले. अक्षयचे कुटुंब निघून गेले. सतीशला वाटलं प्रकरण इथेच संपलं पण तसं नव्हतं.