Crime news live updates
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे देशभरात कुख्यात झालेल्या बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. कारण बीडमध्ये पुन्हा एकदा एका व्यक्तीचे अपहरण करुन त्याला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या कटू आठवणी जाग्या झाल्या आहेत. परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान शिवराज हनुमान दिवटे या तरूणाचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्याला टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेण्यात आले. याठिकाणी समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराज दिवटेला लाठ्याकाठ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत शिवराज दिवटे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला परळी येथून अंबाजोगाईच्या स्वराची रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
18 May 2025 04:23 PM (IST)
दिवसेंदिवस वसई विरार परिसरात अनधिकृतपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांमुळे गुन्हेगारी वाढत जात आहे. नुकतच वसई शहरात अंमली पदार्थांचा मोठा साठा मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मॅफेड्रोन हा घातक अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना नालासोपारात सुरु असल्याची धक्कादायक महिती उजेडात आली असून,एका नायजेरियन महिलेच्या अंगझडतीत तब्बल साडेपाच कोटींहून अधिक रुपयांचे अंमली पदार्थ सापडल्यामुळे पोलीस ही चक्रावून गेले आहेत.
18 May 2025 04:22 PM (IST)
नकवडीत पादचारी ज्येष्ठ महिलेचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला धनकवडी भागात राहायला आहेत. त्या शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास धनकवडीतील हिल टॉप सोसायटी परिसरातून निघाल्या होत्या. धनकवडी ते तळजाई रस्त्यावर दुचाकीस्वार चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ९० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. सहायक निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत. तीन दिवसांपूर्वी कोथरूड, पाषाण परिसरात सकाळी फिरायला निघालेल्या महिलांसह, एका ज्येष्ठ नागरिकाकडील दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले होते.
18 May 2025 04:08 PM (IST)
बिबवेवाडीत पुन्हा टोळक्याने दहशत माजवल्याची घटना घडली असून, अल्पवयीन मुलांनी कोयते उगारून वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर परिसरात दहशत माजवत प्रचंड गोंधळ घातला. अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी सात अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. तोडफोड प्रकरणात दोघांना अटक केली आहे. गणेश कोळी (वय २०) आविष्कार भालेराव (वय २०, दोघे रा. रा. नवीन पद्मवतीनगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
18 May 2025 02:52 PM (IST)
येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात घेऊन जाताना कुख्यात गुंड गजा मारणेसोबत धाब्यावर पार्टी करणाऱ्या त्या साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या साथीदारांनी त्याचा पुण्यातूनच पाठलाग सुरू केला होता. त्याच्याकडून चार महागड्या कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
18 May 2025 02:35 PM (IST)
लहान मुलांच्या क्षुल्लक भांडणातून बापलेकाने आपसात संगनमताने शेजाऱ्यासह त्याच्या पत्नीला शिवीगाळ केली. शेजाऱ्याला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शांतीनगर परिसरातील न्यू आझादनगर येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात बापलेकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्ताक अन्सारी, साहील अन्सारी अशी गुन्हा दाखल झालेल्या बापलेकांची नावे आहेत. तर इस्लामुद्दीन कयामुद्दीन अन्सारी (वय ३६) असे मारहाणीत जखमी झालेल्या शेजाऱ्याचे नाव आहे.
18 May 2025 12:52 PM (IST)
सहकारी मित्राकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आकाश शांताराम बोराडे (वय २३, सध्या, रा. आर. के. नगर, कोल्हापूर, मूळ कतराबाद, परांदा, जि. धाराशिव) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी रुममधून चार पानाची सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे.
18 May 2025 11:46 AM (IST)
माहीम येथे चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरून बेदम मारहाणीत 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या संपूर्ण अंगावर गंभीर जखमा होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी माहीम पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येसाठी वापरलेला बांबू पोलिसांनी जप्त केला असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. माहीम पश्चिम येथील एस. एल. रहेजा मार्गावरील मच्छीमार कॉलनी परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसन मेहबूब शेख (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो माहीम येथील रामगड झोपडपट्टी परिसरात राहत होता. बुधवारी शेख मच्छीमार कॉलनी परिसरातील इमारत क्रमांक 21 येथे वावरत होता. तो चोर असल्याच्या संशयावरून आरोपी मोहम्मद अन्सारीने (वय 43) त्याला बांबूने मारहाण केली. गंभीर दुखापत झाल्यामुळे शेख खाली कोसळला. त्याला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
18 May 2025 11:45 AM (IST)
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. रेल्वेमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या हँड बॅगमधील सुमारे सव्वा लाखाचा ऐवज असलेली पर्स लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दिनांक १५ रोजी कुर्डुवाडी रेल्वे स्थानकात प्लॅटफार्म क्र १ वर रेल्वेमध्ये चढताना घडली आहे. याबाबत कलम हनुमंत हवालदार (रा. नेरुळ मुंबई) यांनी कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.