Crime news live updates
येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात घेऊन जाताना कुख्यात गुंड गजा मारणेसोबत धाब्यावर पार्टी करणाऱ्या त्या साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या साथीदारांनी त्याचा पुण्यातूनच पाठलाग सुरू केला होता. त्याच्याकडून चार महागड्या कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
19 May 2025 05:50 PM (IST)
पुणे शहरातील घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असून, हडपसर भागात कुटूंबिय घरात झोपलेले असताना देखील एका बेडरूममधील २३ लाख ४३ हजारांच्या सोन्या-चांदिच्या दागिन्यांसह तिजोरी पळविल्याचा प्रकार समोर आला आहे. सीसीटीव्हीत संशयित चोरटा कैद झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पार्थ गौंडा पाटील (वय ४४) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
19 May 2025 04:47 PM (IST)
जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवादी कारवाईमध्ये सहभागी असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आज(19 मे) ही माहिती दिली असून त्यांच्याकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. "दहशतवादाविरुद्धच्या कारवाईत, एसओजी शोपियान, सीआरपीएफ १७८ बीएन आणि ३४ आरआर यांच्या संयुक्त पथकाने दोन संशयितांना अटक केली. या कारवाईअंतर्गत ४ हातबॉम्ब, २ पिस्तूल, ४३ जिवंत काडतुसे आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले. दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे," असे शोपियान जिल्हा पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर सांगितले.
19 May 2025 04:09 PM (IST)
पुणे-बंगळुरु आशियाई महामार्गावर बंद पडलेली इरटीगा कार टोव्हींग क्रेनला टोचन करून शोरूमला घेऊन जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅव्हल्सने एट्रिगा कारला जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. मलकापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत डी मार्टसमोर रविवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. याबाबत सचिन गणपत रवले (वय ४०, रा. मालचौंडी ता. जावळी) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ट्रॅव्हल्स चालक संतोष केशव माने (रा. सांगली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
19 May 2025 03:52 PM (IST)
हडपसर भागातील एका कपडे विक्रेत्याची बाजारभावापेक्षा कमी दरात कपडे विक्रीच्या आमिषाने तीन कोटी ४६ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी रोहित हरीश नागदेव, त्याची पत्नी टीना उर्फ मीनाक्षी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४७ वर्षीय कपडे विक्रेत्याने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
19 May 2025 03:28 PM (IST)
पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षेमध्ये वाढ झाली असून यंत्रणा अलर्टवर आली आहे. पुण्यामध्ये हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि पुणे शहराच्या खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी रविवारी दिली.
19 May 2025 02:34 PM (IST)
पुण्यामध्ये हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि पुणे शहराच्या खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त ही कारवाई करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
19 May 2025 01:02 PM (IST)
रात्री तसेच दिवसा एकट्या पादचारी नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला लष्कर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोन आरोपींना बेड्या ठोकत त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. त्यांनी खडक तसेच लष्कर परिसरात नागरिकांना लुटल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. आयान फिरदोस पठाण (वय १८, रा. भवानी पेठ) व अनिकेत दामु आरणे (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांच्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, पोलीस अंमलदार रमेश चौधर व त्यांच्या पथकाने केली आहे.
19 May 2025 12:21 PM (IST)
वाहनांच्या तोडफोडीने बिबवेवाडी परिसर दहशतीत असतानाच मध्यरात्री किरकोळ कारणावरून सराईत गुन्हेगार व त्यांच्या टोळक्याने तुफान राडा घालत हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली. याघटनेने पुन्हा परिसर दहशतमय झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन सराईतांना पकडले असून, त्यांच्या पसार झालेल्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी अमित महावीर लकडे (वय २८, रा. बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गणेश भालके (वय २१), अक्षय भालके (वय २३) आणि देवा डोलारे (वय १८) यांना ताब्यात घेतले आहे.
19 May 2025 12:10 PM (IST)
मुंबईला उडवून देण्याची धमकी देणार फोन अज्ञात व्यक्तीनं केल्यानं खळबळ उडाली आहे. डायल 112 ला धमकीचा फोन आला आहे. जे जे मार्ग परिसरात एका व्यक्तीच संभाषण ऐकल्याचा कॉलरचा दावा आहे.
19 May 2025 11:50 AM (IST)
मद्य पिऊन वाहन चालवल्यानंतर होणारे अपघात विशेषतः राज्यभरात गाजलेला कल्याणीनगरमधील हायप्रोफाईल अपघात प्रकरणानंतर पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने मद्यपी वाहन चालकांवर ‘वक्रदृष्टी’ टाकली असून, वर्षभरातच तब्बल ६ हजार ६५८ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली आहे. पोर्शे अपघातानंतर ही कारवाई तीव्रतेने केली आहे. फक्त कारवाईच न करता या चालकांचे परवाने रद्द करण्यासाठी देखील कारवाई केली आहे. त्यामुळे आता अशा वाहन चालकांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे. मद्यपीवर लगाम देखील काही प्रमाणात बसला आहे.
19 May 2025 11:28 AM (IST)
लष्कर परिसरात ज्येष्ठ नागरिकाला धमकावून तसेच त्याला धक्काबुक्की करुन चोरट्यांनी त्याच्याकडील पाकिट हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने लष्कर पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार वानवडीत राहायला आहेत. ते १० मे रोजी सरबतवाला चौक परिसरातून निघाले होते. त्यावेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी त्यांच्या पाया पडण्याचा बहाणा केला. तेव्हा ज्येष्ठाने त्यांना विरोध केला. चोरट्यांनी झटापट करुन त्याच्या खिशातील पाकिट काढून घेतले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.
19 May 2025 11:27 AM (IST)
लष्कर भागातील साचापीर स्ट्रीट परिसरात एकाच्या हातातील मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. याबाबत एका व्यक्तीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास साचापीर स्ट्रीट परिसरातून निघाले होते. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक मोकाटे तपास करत आहेत.
19 May 2025 11:27 AM (IST)
धनकवडीत पादचारी ज्येष्ठ महिलेचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला धनकवडी भागात राहायला आहेत. त्या शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास धनकवडीतील हिल टॉप सोसायटी परिसरातून निघाल्या होत्या. धनकवडी ते तळजाई रस्त्यावर दुचाकीस्वार चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ९० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. सहायक निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत. तीन दिवसांपूर्वी कोथरूड, पाषाण परिसरात सकाळी फिरायला निघालेल्या महिलांसह, एका ज्येष्ठ नागरिकाकडील दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले होते.