शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक (फोटो- istockphoto)
पुणे: शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणाची २६ लाख रुपयांना फसवणूक केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. याबाबत ३१ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कोंढव्यातील भाग्योदयनगर परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाशी मोबाइलवर सप्टेंबर महिन्यात संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले. त्याचा विश्वास संपादन केला. नंतर तरुणाने गुंतवणूकस्वरूपात चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले.
सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला जाळ्यात ओढण्यासाठी परतावा देखील दिला. त्यामुळे तरुण आपसूकच सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकला. परतावा मिळत असल्याने त्याचाही यावर विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्याला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. चार महिन्यात वेळोवेळी २५ लाख ९९ हजार रुपये खात्यात जमा केले. पैसे जमा झाल्यानंतर चोरट्यांनी मोबाइल बंद केले. त्यावेळी तरुणाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने महिलेची ६ कोटींची फसवणूक
हडपसर भागात शेअर मार्केटमधील गुंतवणूकीबाबत चांगली माहिती देऊ असे सांगत खासगी क्लास चालकाने जादा परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेची तब्बल ५ कोटी ९६ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून, क्लासचालक क्लासला कुलूप लावून फरार झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये प्रतिक कुमार चौखंडे (रा. स्वप्नलोक सोसायटी, पापडेवस्ती, फुरसुंगी, सासवड रोड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा: Cyber Crime: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने तरूणाला लुटले; तब्बल २१ लाखांना घातला गंडा
शेअर बाजारातील कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाला साडेआठ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी मुंढवा पोलिसांत ६७ वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे. पैसे गुंतवणूक केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्याच्याशी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानूसार, सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार कुटुंबिय मुंढव्यातील केशवनगर येथे राहण्यास आहेत. दरम्यान, तक्रारदारांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्याने शेअर बाजाराबाबत माहिती दिली. तसेच, आमच्या कंपनीच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, असे सांगितले. आमच्या कंपनीकडून चांगला परतावा मिळेल, असे आमीष दाखवले. त्यानुसार तक्रारदार यांनी ८ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, पैसे गुंतवणूक केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्याच्याशी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.