सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे/अक्षय फाटक : चारशे पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठोकलेला तळ अन् गावकऱ्यांनी दिलेली मोलाची साथ अशा तिहेरी झालेल्या अथक प्रयत्नानंतर स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचारातील नराधम पकडण्याचा सलग तीन दिवस चाललेला थरार अखेर संपला. दीड ते पावणे दोनच्या सुमारास नराधम थकलेल्या अवस्थेत एक शेतात धान्यावर फवारण्यासाठी लागणारी किटक नाशकाची बॉटल हातात घेऊन शेतातून बाहेर पडला अन् त्याला पाहताच गावकरी व पोलिसांनी पकडले. नराधम पकडल्याची ही वर्ता वाऱ्यासारखी पुणे पोलीस दल, ग्रामीण पोलीस व गावात समजली आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. स्वारगेट पोलीस त्याला घेऊन पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास पुण्यात आले. तेव्हा कुठे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त स्मार्तना पाटील, गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, प्रवीण पाटील, उपायुक्त निखील पिंगळे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शांततेने ‘विश्रांती’चे चारतास सुखाने घालवले.
दत्तात्रय रामदास गाडे (वय ३६) याचा मंगळवारी सकाळी साधारण दहापासून स्वारगेट पोलीस व गुन्हे शाखेची पथके शोध घेत होते. प्रथम त्याची ओळख पटविण्यासाठी तास-दोन तासाचा वेळ लागल्याने पोलिसांना तो काही तासात हाती येईल, असा समज होता. पण, एकामागून एक तास त्याचा शोध घेण्यात निघू लागल्याने पुणे पोलिसांवर ‘प्रेशर’ वाढत राहिले. तो गावी गेला, या माहितीवरून स्वारगेट पोलिसांच्या पथकाने दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास गुनाट गाव देखील गाठले. ते त्याच्या घरी पोहचले देखील पण, पोलिसांची थोडी गफलत त्याच्या पथ्यावर पडली. ही संधी मिळताच दत्तात्रय पोलिसांना हुलकावून देऊन पसार झाला. पोलीस त्याच्या भावालाच आरोपी म्हणून घेऊन आले. जेव्हा भावाने तो मी नाही, माझा भाऊ दत्तात्रयला शोधत असाल असे सांगितले. तेव्हा मात्र पोलिसांना गफलत लक्षात आली. तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला होता.
त्यानंतर सुरू झाला नराधम दत्तात्रय याचा शोध. मंगळवारी दुपारनंतर पोलीस पुण्यासह जिल्ह्यात व आसपासचा परिसर पिंजून काढत त्याचा ठावठिकाणा शोधत होते. पण हाती काहीच लागले नाही. बुधवारी सकाळपासून मात्र पोलिसांचे शोध सत्र त्रासदायक आणि अडचणींचे सुरू झाले. दत्तात्रय कुठेच मिळत नसल्याने आणखी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौज फाटा रस्त्यावर उतरविण्यात आला. बुधवारचा पुर्ण दिवस पुर्ण ग्रामीण परिसर पिंजून काढण्यात आला. मात्र, कुठेही शोध लागला नाही. काही पथक शिरूर तालुक्यातच ठान मांडून होते. तेव्हाच पोलिसांना बुधवारी रात्री दत्तात्रय एका घरी पाणी पिण्यासाठी गेल्याची माहिती समजली. मग, मात्र पोलिसांना तो गुनाट गावाच्या आसपासच असल्याची खात्री झाली. मग, पोलिसांनी सर्वच फौजफाटा गुनाट गाव व शिरूर भोवती पाठवला.
बुधवारी रात्रीपासून पोलीस या भागात शोध मोहिम राबवत असतानाच तो शेता-शेतातून ऊस व इतर भागायत शेतीत लपून असल्याचे निष्पन्न झाले. नंतर मात्र मग ४०० पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा, शंभरच्या जवळपास अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तळ ठोकूनच त्याचा ठावठिकाणी शोधण्यास सुरूवात केली. धाराशिव व पुणे ग्रामीण पोलिसांकडून स्पेशल ड्रोन मागवत ड्रोनने शेतांची पाहणी सुरू केली. त्यातही तो कुठेही कैद होत नसल्याने पोलिसांनी गावकऱ्यांना विश्वासात घेतले. त्यांना मदतीला घेतले. गावकऱ्यांनी देखील उत्स्फुर्तपणे पोलिसांना मदत सुरू केली. गुरूवारी या शोध मोहिमेला आणखीनच धार आली. पोलीस ऊसाचे शेत पिंजून काढू लागले. दिवसभर एक भाग पिंजून काढल्यानंतर रात्री पुन्हा या मोहिमेला सुरूवात झाली.
त्याचवेळी साडे दहाच्या सुमारास पोलिसांना एकाने दत्तात्रय पाणी पिण्यासाठी आला होता. तो मी, पोलिसांना शरण जाणार आहे, असे म्हणत आहे, अशी माहिती त्याच्याच नातेवाईकांनी दिली. त्यानंतर पोलीसांनी चटकन संबंधित नातेवाईकांचे घर गाठले. पोलिसांनी तीन तास पुन्हा त्याची शोध मोहिम सुरू ठेवली. कांद्याच्या शेतातून तो अंधाराने पायी जात असताना दिसताच गावकऱ्यांनी व पोलिसांनी त्याला दीडच्या सुमारास पकडले आणि सलग सुरू झालेल्या या शोध मोहिमेचा शेवट झाला.