साडेचार वर्षाच्या चिमुरडीवर युवकाकडून अत्याचार (File Photo : Crime)
कराड : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही वाढताना दिसत आहे. असे असताना कराडमध्ये एका साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कराड तालुक्यात ही घटना घडली.
पीडित चिमुकलीची आई स्वयंपाक बनवत असल्याने चिमुकली खेळण्यासाठी घराबाहेर आली. घराबाहेर आलेल्या चिमुरडीवर युवकाने अत्याचार केल्याच्या संतापजनक प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी सायकांळच्या सुमारास पीडित मुलीची आई त्यांच्याशेजारी आखाड जेवणाचा कार्यक्रम असल्याने मदतीसाठी गेली होती. यावेळी त्यांनी आपल्या साडेचार वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेले होते. पीडित मुलीची आई स्वयंपाक बनवण्यात व्यस्त होती. त्यावेळी चिमुरडी घरातून खेळण्यासाठी बाहेर गेली होती.
त्याचवेळी संशयित युवकाने चिमुरडीला परिसरात कोणी नसल्याची संधी साधत आपल्या घरी नेऊन तिथे अत्याचार केले. त्यानंतर काही वेळाने चिमुरडीच्या आईच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्यासह वरिष्ठ शहर पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या धक्कादायक घटनेनंतर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल, आरोपी अटकेत
साडेचार वर्षांच्या चिमुरडीला स्वतःच्या घरात नेऊन युवकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कराड तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबधित संशयित युवकास पोलिसांनी अटक केली आहे.
10 वर्षांच्या मुलावर तिघांचा अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, मुंबईत 10 वर्षांच्या मुलावर तीन जणांनी अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतील चुनाभट्टी येथे घडली आहे. पीडित मुलगा व तिघेजण एकमेकांच्या ओळखीचे असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.