संग्रहित फोटो
पुणे : मद्यप्राशन करून नागरिकांशी गैरवर्तन तसेच धमकावण्याचे गंभीर प्रकार समोर आल्यानंतर विश्रांतवाडी पोलिस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या ‘कॉप्स २४ बीट मार्शल’मधील चार पोलिस शिपायांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. योगेश सुरेश माळी, मुकेश श्रीधर वाळले, शंकर दत्ता धोत्रे आणि कैलास शेषराव फुपाटे अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. चारही कर्मचारी गुन्हे शाखेअंतर्गत कॉप्स २४ बीट मार्शल पथकात नेमणुकीवर होते.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून महत्वाकांक्षी कॉप्स २४ हा उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी दोन कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. हद्दीत गस्त व पेट्रोलिंग तसेच घटनास्थळी तत्काळ पोहचून नागरिकांना मदत मिळावी, यासाठी हा उपक्रम सुरू केला होता. गुन्हे शाखेच्या अंतर्गत हे कॉप्स २४ चे कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, कॉप्स २४ चे कर्मचारी हे दुसरेच उद्योग करत असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांवरून दिसत आहे.
११ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारास आळंदी रोड पोलिस चौकी हद्दीतील काही नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रत्यक्ष चौकीत येऊन तक्रार नोंदवली. संबंधित चारही पोलिस शिपायांनी मद्यधुंद अवस्थेत व्यापाऱ्यांना धमकावत आरोप केला. या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. तसेच, दुसऱ्या दिवशी हजेरीदरम्यान या पोलिसांकडे वरिष्ठांनी विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. या पार्श्वभूमीवर त्यांना निलंबित करण्याचे आदेश गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिले. कर्तव्यावर असताना मद्यप्राशन, नागरिकांशी अमानुष वर्तन केल्याचे व पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कर्तव्यावर असतानाच त्यांनी मद्य प्राशन केले होते. आळंदी रोड पोलिस चौकीच्या हद्दीत त्यांनी राडा घातला. आम्ही पोलिस आहे, आमचे कोणी काही करू शकत नाही. आमच्याकडे पैसे मागितले तर तुम्हाला हद्दीत धंदा करून देणार नाही असे बोलून गैरवर्तन करत शिवीगाळ केली.
समज दिल्यानंतरही सुधारणा नाही
निलंबीत करण्यात आलेल्या या चौघा बीट मार्शलला अनेकदा समज देण्यात आली होती. नेमणूक दिलेले काम न करणे, हजेरीला उपस्थित न राहणे, कामचुकारपना करणे अशी कृत्य त्यांनी यापुर्वी देखील केली. दरम्यानच्या कालावधीत त्यांना अनेकदा समज देखील देण्यात आली. परंतू त्यांच्या वर्तनात काही फरक पडलेला दिसून आला नाही. विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ निरीक्षकांनी यातील दोघांचा कसुरी अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता.






