सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : सायबर चोरट्यांकडून कोट्यवधींचा गंडा घातला जात असताना आता या सायबर गुन्हेगारांनी महिलांना मानसिक व शारिरीक त्रास देण्यास देखील सुरूवात केली असून, तपासणीच्या नावाखाली महिलांचा विनयभंग करू लागले आहेत. या महिलेला पार्सलमध्ये ड्रग्स सापडल्याचे सांगून नंतर थरमल इमेजिंग करायचे असल्याचे सांगत महिलेला विवस्त्र करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सदाशिव पेठेत राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेने विश्रमबाग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ७ ते ११ ऑगस्ट दरम्यानच्या काळात घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पिडीत महिला आयटी कंपनीत नोकरी करतात. सायबर चोरट्याने महिलेशी संपर्क साधला व तुमच्या नावे मलेशिया येथे एक पार्सल पाठविले आहे. त्यात खोटे १२ एटीएम, खोटा पासपोर्ट व १४० ग्रॅम एमडी असल्याचे सांगितले. त्यांना अटकेची भीती दाखवली. मात्र, महिलेने त्यांना त्या पार्सलशी काही संबंध नसल्याचे सांगितले. परंतु, या सायबर चोरटयांनी यासाठी तुम्हाला पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल असे सांगितले.
दिल्लीतील वसंतकुंज पोलीस ठाण्यातून बोलत असल्याची बतावणी करून चोरट्यांनी एका बँकेत महिलेला पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने दोन लाख २२ हजार रुपये पाठविले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर पुन्हा संपर्क साधला. तुम्ही अमली पदार्थ शरीरात लपवले आहेत. थर्मल इमेजिंग करायची आहे, अशी बतावणी केली. चोरट्यांनी महिलेला ‘व्हिडीओ कॉल’ केला. चोरट्यांनी महिलेला विवस्त्र होण्यास भाग पाडले, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत.