अमरावतीत मोठा घोटाळा; तारण म्हणून ठेवलेला माल परस्परच विकला, तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात विविध आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. असे असताना आता अमरावतीत तारण म्हणून ठेवलेल्या कृषी मालाची परस्पर विक्री करून तब्बल ३ कोटी ५४ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेच्या पत्रावरून बडनेरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दीपक बाबाराव बांबल (वय ५२, दत्तविहार कॉलनी) यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या या तक्रारीवरून आरोपी गौरव मुंधडा आणि सुमीत भंसाली यांच्याविरोधात संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव विजयकुमार मुंधडा (वय ५२, रा. दत्तविहार कॉलनी, अमरावती) यांनी नेमाणी गोडाऊन, बडनेरा येथे गोडाऊन क्रमांक १, ८ आणि ११ भाड्याने घेतले होते. येथे त्यांनी सोयाबीन, चणा, मका, ढेप असा कृषी माल साठवून त्याच्या पावत्या खामगाव को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे तारण ठेवल्या.
त्यात ६५ लाख कर्ज, ३५ लाख आणि ४० लाख अशा प्रकारे गौरव मुंधडा यांनी एकूण १.४० कोटींचे कर्ज घेतले. आरोपी सुमीत कांतीलाल भंसाली (वय ३७, रा. भाजीबाजार, अमरावती) याने देखील त्याच गोडाऊनमध्ये ठेवलेल्या मालाच्या पावत्या तारण ठेऊन १३८५६००० रुपये, ५८ लाख व ६१९०००० रुपयांप्रमाणे त्यांनीही मोठ्या रकमेची उचल केली.
बँकेची परवानगी न घेता माल विक्री
दोन्ही आरोपींनी तारण ठेवलेला स्वतःचा माल, तसेच आपसात संगनमत करून एकमेकांचा तारणातील माल, बँकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता परस्पर विक्री करून टाकला. त्यामुळे बँकेला मोठे आर्थिक नुकसान झाले. तारणातील माल विक्री केल्यानंतर गौरव मुंधडा याने ९२०४७८१.२२ रुपये व सुमीत भंसालीने २६२८५९८२ रुपये अशी एकूण ३५४९०७६३ रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकाराने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
NEET मध्ये गुण वाढवून देतो म्हणत गंडा
दुसऱ्या एका घटनेत, वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाची समजली जाणारी नीट या परीक्षेमध्ये गुण 600 पेक्षा जास्त गुण वाढवून देतो, असा विश्वास संपादन करून एक कोटी दहा लाख रुपयांची फसवणूक केली. सदरची घटना २०२३ ते २०२४ च्या दरम्यान सात रस्ता सोलापूर येथे घडली. याप्रकरणी मेहदीअली ईकराम सय्यद (वय ४७, रा. टिळक नगर, मजरेवाडी, सोलापूर) यांनी आरोपी अरविंद गोविंद चंडक (रा. साई सत्यम रेसिडेन्सी, भवानी पेठ, सोलापूर) यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
हेदेखील वाचा : वाढता सायबर फ्रॉड थांबवण्यासाठी टेलिकॉम विभाग लागू करणार नवे नियम! या कंपन्यांना करावे लागणार मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन






