'माझं लग्न झालंय, पत्नीला माझ्यासोबत पाठवा', असं म्हणताच दोघांनी तरुणाला...
मलकापूर : विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली एका तरुणाकडून तब्बल 2 लाख 75 हजार रुपये उकळणाऱ्या दोन दलालांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. तर इतर तीन जण अद्याप पसार असून, त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. सत्यनारायणाची पूजा नववधूच्या गावी अकोला येथे करण्यात आली. या पूजेनंतर नवविवाहित तरुणाला या दलालांकडून मारहाण करत हाकलून देण्यात आले.
‘माझे लग्न झाले आहे, तुम्ही लग्न लावून दिले, माझ्या पत्नीला माझ्यासोबत पाठवा. अथवा माझे पैसे मला परत द्या’, असा तगादा लावल्यानंतर त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या देण्यात आल्या. लग्न लावलेली पत्नीही मिळेना, पण लग्न करताना दलालांना दिलेले पैसे देखील परत मिळत नाही, याची खात्री झाल्यानंतर त्या नवरदेवाने थेट मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिसांना सर्व आपबिती सांगून तक्रार दाखल केली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
दरम्यान, पोलिस निरीक्षक संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या एका पथकाने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून संभाजी खापरकर (वय 37), वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथून लाला हरिश्चंद्र महाजन (वय 36) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 50 हजार रुपये रोख रक्कम व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. नववधू, तिची आई आणि मामा पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहे. पोलिसांनी अटक केलेल्या त्या दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पुण्यातही एकाची फसवणूक
दुसऱ्या एका घटनेत, ‘शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास ३० ते ३५ टक्के परतावा मिळेल,’ असे आमिष दाखवून अनेकांची १ कोटी २१ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी धायरीतील ३४ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यावरून नांदेडसिटी पोलिसांत गुजरातमधील प्रियांक दवे, अभयकुमार दवे, मित दवे, सुमित बोराणा, झील जैन, अयुष सेवक, जय पटेल, पंकज जैन, पिंटू जानी आणि निकुंज जानी (रा. लुणावडा व गोध्रा, गुजरात) अशा नावाच्या व्यक्तींवर गुन्हा नोंदवला आहे.