पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहूरोड बायपासवर पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहे. मृत्यू झालेले दोन्ही विद्यार्थी सिम्बायोसिस कॉलेजचे असल्याचे समोर आले आहे. त्यांची भरधाव स्विफ्ट कार कंटेनरवर आदळल्याने हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की गाडी अक्षरश: चक्काचूर झाली. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी, सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. सिम्बायोसिस कॉलेजचे चार विद्यार्थी काल रात्री लोणावळ्याला फिरायला गेले होते. परत येताना त्यांची स्विफ्ट कार देहूरोड बायपासवर असताना समोरील एका कंटेनरवर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन विध्यार्थी गंभीर जखमी आहे.
अपघातात कारमध्ये दिव्य राज सिंग प्रेम सिंग राठोड (वय २० वर्ष), सिद्धांत आनंद शेखर (वय २० वर्ष) या दोघांचं जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय हर्ष मिश्रा (वय २१ वर्ष), निहार तांबोळी (२० वय वर्षे) हे किरकोळ जखमी झाले आहे. त्यांच्यावर लाईफ लाईन हॉस्पिटल वाकड येथे उपचार सुरू आहे. स्विफ्ट डिझायर कारमधील मुले सिम्बॉयसिस कॉलेजच्या BBA ला शिकत होते.
या घटनेतील आयशर कंटेनर चालक मनीष कुमार सुरज मणिपाल (39 वर्षे) वडाळा येथील राहणारा असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. गाडीचा स्पीड जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. कार चालकाला डुलकी लागली की नेमकं काय झालं याबाबत तपास पोलीस करत आहे.
रस्ता न दिल्याच्या वादातून कुख्यात घायवळ टोळीचा गोळीबार
दरम्यान , रस्ता न दिल्याच्या रागातून पुण्यात गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे. ही घटना कोथरूड भागात मध्यरात्री घडली आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील सदस्यांनी केलेल्या या गोळीबारात ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ हा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात प्रकाश धुमाकुळच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. तर इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे.