छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात रविवारी दुपारी एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृत व्यक्तीचे नाव राहुल रमेश नवथर असे आहे. त्याच्या छातीवर व हातावर गंभीर जखमा दिसून आल्याने गोळ्या झाडून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या घटनेचा पोलिसांनी छडा लावला असून एका आरोपीला अटक केली आहे.
‘आवाज केला तर तुला…’; मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी केली चोरी, दागिन्यांसह रक्कमही लंपास
नेमकं काय घडलं?
मंगळवारी, १६ सप्टेंबर रोजी, गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात रमेश नवथर याची अज्ञाताने गोळी झाडून हत्या झाल्याची बाब समोर आली होती. गंगापूर पोलिसांनी या खून प्रकरणाचा उलगडा केला आहे. मृत राहुल नवथर सोमवारी दुपारी कानिफनाथ मावस आणि योगेश कल्याण नागे (दोघेही रा. भिवधानोरा) या दोन मित्रांसह भिवधानोरा शिवारातील गट क्र. 306 मधील शेतात दारू पिण्यास बसला होता. दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाला. मावस व नागे यांनी राहुलवर गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी राहुलच्या डाव्या बरगडीत, दुसरी खांद्यावर, तर तिसरी पोटात लागल्याने राहुल जागीच मृत्युमुखी पडला. मृतदेह तसाच सोडून मावस आणि नागे घटनास्थळावरून पसार झाले.
पोलिसांनी पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले. याप्रकरणी मृत राहुलचा भाऊ महेश नवथर यांनी कानिफनाथ मावस याने राहुलला गोळ्या घातल्याची आणि त्यासाठी योगेश नागे याने त्यास मदत केल्याची फिर्याद मंगळवारी रात्री उशिरा गंगापूर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, आरोपी मावस आणि नागे यांनी राहुलवर का गोळ्या झाडल्या, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वर्चस्ववादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे.
आरोपी योगेश नागे हा पुण्याकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पोलिसांनी बुधवारी (१७ सप्टेंबर) पहाटे तीनच्या सुमारास नेवासा फाटा येथे बेड्या ठोकल्या. गुन्ह्यातील दुसरा आरोपी कानिफनाथ मावस अद्याप फरार असून, त्याने मोबाइल बंद करून ठेवल्याने पोलिसांना त्याचे लोकेशन मिळण्यात अडचणी येत आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.