पत्नीच्या हत्येसाठी पतीला भोगावा लागला तुरुंगवास (File Photo : Crime)
बंगळुरू : कर्नाटकातील कोडगु जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 2020 मध्ये मृत मानण्यात आलेली आणि तिच्या पतीला हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आलेली एक महिला आता जिवंत आढळली आहे. एक एप्रिल रोजी एका हॉटेलमध्ये ही महिला दिसली. जिथे ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत जेवत होती. या घटनेमुळे पोलिस तपासातील गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत.
कोडगु जिल्ह्यात ही अतिशय गंभीर बाब लक्षात घेऊन न्यायालयाने जिल्हा पोलिस अधीक्षकांना (एसपी) समन्स बजावले आहे आणि 17 एप्रिलपर्यंत संपूर्ण अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. कोडगु जिल्ह्यातील कुशलनगरजवळील एका गावात राहणाऱ्या सुरेशने 18 वर्षांपूर्वी मल्लिगे नावाच्या महिलेशी लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुले आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये, त्याची पत्नी मल्लिगे अचानक बेपत्ता झाली.
दरम्यान, सुरेशने कुशलनगर ग्रामीण पोलिस ठाण्यात त्याची पत्नी मल्लिगे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लगेचच, बेट्टादरपुरा (पेरियापटना तालुका) परिसरात एका महिलेचा सांगाडा सापडला. पोलिसांनी तो मल्लिगेचा सांगाडा असल्याचे गृहीत धरले आणि सुरेशला अटक केली आणि खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
सुरेशच्या वडिलांची सुटकेसाठी धाव
सुरेश तुरुंगात असताना त्याच्या वडिलांनी त्याच्या सुटकेसाठी अनेक वकिलांशी संपर्क साधला. मात्र, कोणीही केस घेण्यास तयार नव्हते. अखेर जानेवारी 2022 मध्ये, म्हैसूरचे वकील बीएस पांडू पुजारी यांनी खटला लढण्यास सहमती दर्शवली. यासाठी त्यांनी कोणतेही शुल्क आकारले नसल्याची माहिती आहे. त्यांनी आरोपपत्र आणि साक्षीदारांचे जबाब वाचून दाखवले आणि नंतर न्यायालयाला मल्लीगेच्या आईची डीएनए चाचणी करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर डीएनए नमुना चाचणी करण्यात आली. त्यानंतर या सर्व प्रकाराची माहिती समोर आली.