राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष झाल्याने वळ भागामध्ये अवैध दारू विक्रीचे अड्डे वाढले आहे (फोटो - सोशल मीडिया)
तालुक्यात अवैध दारू विक्रीचे अड्डे सर्वश्रुत असतानाही उत्पादन शुल्क विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने, “ही मूक संमती तर नाही ना?” असा थेट सवाल उपस्थित होत आहे. परिणामी, अवैध दारू व्यवसायिकांचे मनोबल वाढले असून सामाजिक आरोग्य व कायदा-सुव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, उत्पादन शुल्क विभाग अपयशी ठरत असताना गुन्हे शाखा युनिट ४, पिंपरी-चिंचवड यांच्या पथकाने पुढाकार घेत अवैध हातभट्टी दारूविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १ लाख ४५ हजार रुपये किमतीचा तब्बल २९०० लिटर गुळमिश्रित रसायन साठा जप्त करून नष्ट करण्यात आला.
हे देखील वाचा : बिहारच्या आमदार मैथिली ठाकूर प्रचारासाठी मुंबईच्या मैदानात; उत्तर भारतीयांच्या मतांसाठी महायुतीची तिरपी चाल
शुक्रवार (दि. १० जानेवारी २०२६) रोजी गुन्हे शाखा युनिट ४ अंतर्गत पोहवा. १३०० सोडगीर, पोहवा. १८९८ गाडेकर व पोशिं. २१२० मुंडे हे अधिकारी पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत शिरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील दारूबंरे परिसरात ओढ्याच्या कडेला हातभट्टी दारू तयार करण्यासाठी रसायन भिजत घातले असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे तात्काळ छापा टाकण्यात आला असता, हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे २९०० लिटर गुळमिश्रित रसायन आढळून आले. सदर मुद्देमालाची किंमत अंदाजे १,४५,००० रुपये असून तो प्रोव्हिबिशन कायद्यान्वये नष्ट करण्यात आला.
या प्रकरणी चंपा सनी कर्मावत, रा. भोंडवे वस्ती, किवळे, ता. हवेली, जि. पुणे या महिला आरोपीविरुद्ध शिरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जितेंद्र कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अतिरिक्त कार्यभार, गुन्हे शाखा युनिट ४, पिंपरी-चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
हे देखील वाचा : पुण्यात लग्न जमवण्याचा प्रकार पडला महागात; २६ लाख ५० हजारला घातला गंडा
उत्पादन शुल्क विभागाची चौकशी होणार का?
अवैध दारूचे अड्डे उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांमधून होत आहे.






