संग्रहित फोटो
पुणे : सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडीत आजाराला कंटाळून शेतकऱ्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. येथील धुमाळ मळा येथे ही घटना घडली. बाळासाहेब निवृत्ती कुंजीर (वय ६१) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे परवाना असलेले पिस्तुल होते. त्यातूनच त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली, अशी माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, बाळासाहेब कुटुंबासोबत रहात होते. कुंजीर यांना मधुमेहाचा त्रास होता. तसेच त्यांना चार वर्षापूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यावेळी म्युकर मायकोसिसची बाधा झाली. त्यात त्यांचा एक डोळा निकामी झाला होता. तसेच, शारीरिक मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे ते शक्यतो घरातच राहत असत.
दरम्यान, कुंजीर यांच्या नातेवाईकांच्या घरी शुक्रवारी कार्यक्रम होता. त्यामुळे घरातील सर्व सदस्य कार्यक्रमाला गेले होते. तेंव्हा कुंजीर घरात एकटेच होते. घरातील मंडळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घरी आली. तेंव्हा कुंजीर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे दिसून आले. कुंजीर यांच्या मुलाने याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच, सहाय्यक आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कुंजीर यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, कुंजीर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
पुण्यात आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पती तसेच सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विमानतळ परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आले. नयना प्रकाश माघाडे (वय २६, रा. विठ्ठल निवास, संतनगर, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे आहे. याप्रकरणी पती प्रकाश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नयना यांचे भाऊ जय खरात (वय २८, रा. निंबगाव जाळी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नयना यांचा प्रकाश याच्याशी चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर प्रकाशने नयना यांचा छळ सुरू केला. माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. पैसे न आणल्याने मारहाण करून मानसिक व शारिरीक छळ केला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून नयना यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.