संग्रहित फोटो
पुणे : बिबवेवाडीत टोळक्याने जुन्या वादातून ६० ते ७० वाहनांची तोडफोड केल्यानंतर पोलिसांनी त्यांना गुडघ्यावर आणले अन् तोडफोड करणाऱ्यांना एकप्रकारे इशाराच दिला. पण, बिबवेवाडी शांत होत असतानाच गुन्हेगाराच्या भावाने दारूच्या नशेत लक्ष्मीनगर भागात २० ते २२ वाहनांचे खळखट्याक केले. लक्ष्मीनगरात तोडफोड सुरू असताना इकडे मध्यभागात अज्ञाताने वाहने फोडल्याची घटना घडली. सलग घडणाऱ्या वाहन तोडफोडीने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी सयाजी संभाजी डोलारे (वय.२०, रा.लक्ष्मीनगर, येरवडा) याच्यावर येरवडा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रिक्षा चालकाने तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार,”डोलारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. बुधवारी मध्यरात्री भरपूर दारू प्यायला. नतंर धारधार हत्यार हातात घेऊन परिसरात जोरजोराने आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे आवाजाने काही लोक घराबाहेर आले. लोकांना पाहून आरोपीने हत्याराने रस्त्यावर उभारलेल्या वाहनांच्या काचा फोडायला सुरुवात केली. यामध्ये बारा रिक्षा, टेम्पो, दोन दुचाकी आणि जेसीबीच्या काचा फोडून लोकांमध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे लोकांनी घाबरून घरात जाऊन दारे बंद करून घेतली. रिक्षाची तोडफोड पाहून रिक्षा चालक बाहेर आल्यावर आरोपीने त्याच्यावर हत्याराने वार करून जखमी करून फरार झाला. येरवडा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही चित्रीकरण तपासल्यावर डोलारेने हत्याराने वाहनांची तोडफोड करताना दिसून आला.
याघटनेसोबतच फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तापकीर गल्लीत दोन ते तीन जणांनी एक रिक्षा आणि एक बुलेटची तोडफोड केली. जुन्या वादातून हा प्रकार घडला असावा असे वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात येत असून, संशयितांना ताब्यात घेतले आहे.
शहरात तसेच लगतच्या उपनगरात दहशत माजविण्याचे प्रकार वाढले असून, त्यातीलच एकप्रकार दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची तोडफोड, या घटना वाढल्या आहेत. बिबवेवाडीतल्या घटनेने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असतानाच येरवडा तसेच लक्ष्मीनगरमध्ये रात्री तोडफोडीची घटना घडली. विशेषत; उपनगरातील वाढती गुन्हेगारी, तसेच वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुंड टोळ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले. वाहन तोडफोडीच्या घटना रोखण्यासाठी कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर शहरात तोडफोडीचे प्रकार सुरू आहेत.
३७ दिवसात ११ घटना
शहरात गेल्या काही वर्षांपासून वाहन तोडफोडीचे फॅड आले आहे. नवं वर्ष सुरू होऊन आता ३७ दिवस झाले आहेत. या ३७ दिवसात मात्र, शहरात ११ ठिकाणी वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. पर्वती, येरवडा, कोंढवा, विमाननगर, बिबवेवाडीत या घटना घडल्या आहेत.