सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करुन कोंढवा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. पोलीस ठाण्यातील प्रिंटर आपटून नुकसान केले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चौघांवर गुन्हा नोंद केला आहे. यात अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
याप्रकरणी फाल्गुनी कुमारन पिल्ले (वय १८), कुमारन जयराम पिल्ले (वय ४८), शीतल कुमारन पिल्ले (वय ४६), तसेच एका अल्पवयीनावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिला पोलीस शिपाई शिल्पा पवार यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पिल्ले कुटुंबीय वानवडी बाजार परिसरात राहायला आहेत. कोंढवा पोलिसांत असलेल्या गुन्ह्यात फाल्गुनीला पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिले होते. फाल्गुनी, तिचे वडील कुमारन, आई शीतल आणि १४ वर्षांचा भाऊ मंगळवारी सायंकाळी कोंढवा पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांच्याशी हुज्जत घातली. महिला पोलीस शिपाई अक्षया भुजबळ यांनी फाल्गुनीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
फाल्गुनीने पोलीस शिपाई भुजबळ यांच्या हाताचा चावा घेतला. त्यांना ओरखडले. फाल्गुनीची आई शीतल हिने त्यांच्या पोटात लाथ मारली. पोलीस शिपाई पवार यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. फाल्गुनी, शीतल आणि वडील कुमारन आणि भावाने त्यांना धक्काबुक्की केली. आमच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला. पोलीस आयुक्तांकडे तक्रार करुन तुमची नोकरी घालवितो, अशी धमकी त्यांनी दिली. पोलीस ठाण्यातील प्रिंटर जमिनीवर आपटून नुकसान केले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक मोहसीन पठाण अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : सांगलीत पोलीस स्टेशन समोरच फ्री स्टाईल हाणामारी, नेमकं काय घडलं?
दुचाकीस्वार महिलेकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली दुचाकीस्वार महिलेने वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिसाला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याची घटना वारजे भागात घडली आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी दुचाकीस्वार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वारजे वाहतूक विभागातील पोलीस शिपाई ऋतुजा तांबे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका दुचाकीस्वार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई ऋतुजा तांबे दाेन दिवसांपूर्वी सायंकाळी वाहतूक नियमन करत होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार महिलेने वाहतूक नियमांचा भंग केला. विरुद्ध दिशेने निघालेल्या दुचाकीस्वार महिलेला पोलीस शिपाई तांबे यांनी अडवले. दुचाकीस्वार महिलेवर कारवाई करताना तिने पोलीस शिपाई तांबे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.