Cyber Job Scam Abroad: परदेशातील जादा पगाराच्या नोकरीचे आमिष, सायबर फ्रॉड न केल्यास केले जाते शोषण (फोटो-सोशल मीडिया)
Cyber Job Scam Abroad: परदेशात जादा पगाराच्या आमिषाने तरुणी आणि तरुणांना घेऊन जाऊन तेथे त्यांच्याकडून सायबर गुन्हे करवून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड सायबर पोलीसांच्या तपासातून समोर आला आहे. फेसबुकवरील जाहिरातीला बळी पडून कंबोडियात नोकरीसाठी गेलेल्या रत्नागिरीच्या तरुणाला सायबर गुलाम बनवण्यात आले. सायबर फ्रॉडचे काम करण्यास नकार दिल्यामुळे या तरुणावर अमानुष अत्याचार करण्यात आले. तब्बल चार महिने त्याला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. मात्र, त्याने लोकांना फ्रॉडमध्ये न अडकविल्याने अखेर त्याला सोडून देण्यात आले.
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास करत असताना काही क्लू मिळाल्यानंतर त्यांनी रत्नागिरी गाठली. तेथे हे सायबर पोलिस दानेश नावाच्या व्यक्तीचा शोध घेत असताना परिसरातून कंबोडीयाला कोण कोण गेले याची माहिती घेतली जात होती, त्यावेळी या युवकाचे नाव समोर आले. मागच्या आठवड्यात पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता हे प्रकरण समोर आले.
कंबोडियामध्ये हिंदुस्थानातील विविध राज्यातील ५० ते ६० नागरिक सायबर गुलाम बनविले असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची कामे करून घेतली जातात.
जो काम करत नाही त्याला मारहाण, विजेचे झटके देणे, बोट कापणे, महिला असेल तर बलात्काराची धमकी देणे, शारीरिक अत्याचार करणे असे प्रकार केले जातात. त्यामुळे काही जण नाईलाजास्तव सायबर कोट्यावधीचे फ्रॉड करतात. मात्र, त्यांना मासिक पगार केवळ एक लाख रूपयेच मिळतो, असे कातकाडे यांनी सांगितले. परदेशात जादा पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून तरूणांना नेले जाते. तिथे त्यांना बेकायदेशीर सायबर फ्रॉडचे काम करण्यास भाग पाडले जाते. तरुणांनी परदेशातील नोकरीसाठी जाताना एजंट, कंपनी, व्हिसा आणि कराराची पूर्ण खात्री करूनच निर्णय घ्यावा.’
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






