संग्रहित फोटो
पुणे : सातारा रस्त्यावरून दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. व्यापाऱ्याचे अपहरणकर्ते तसेच व्यापाऱ्याचे अद्यापही काहीही लोकेशन मिळू शकलेले नाही. आर्थिक वादातून अपहरण झाले असण्याची शक्यता आहे. पोलीस कसून शोध घेत असून, सातारा रस्त्यावरील एका सोसायटीच्या परिसरातून सोमवारी सायंकाळी हे अपहरण झाले आहे.
याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत अपहर्त व्यापाऱ्याच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, हिरे व्यापारी कुटुंबीयांसह पुणे-सातारा रस्त्यावर बिबवेवाडी परिसरातील सोसायटीत राहतात. हिरजडीत दागिन्यांची विक्री ते करतात. सोमवारी (४ मार्च) व्यापारी आणि त्यांची पत्नी मुलीला शाळेत आणण्यासाठी सॅलिसबरी पार्क परिसरात गेले होते. कारने सोसायटीत आले. नंतर लष्कर भागात कामानिमित्त जाणार आहे, असे सांगून व्यापारी दुचाकीने कॉम्पात आले होते. नंतर सायंकाळी सहाच्या सुमारास व्यापाऱ्याच्या पत्नीला त्यांच्यात फोनवरून संपर्क साधण्यात आला.
‘मैने आपके पतीको उठाया है, दो करोड तयार रखो, आपके ससूरजी को बोलो, दो घंटे में फोन करेंगे’ अशी धमकी दिली. नंतर व्यापाऱ्याच्या पत्नीने त्वरीत या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे, विवेक मासाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबवेवाडी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ निरीक्षक शंकर साळुंखे तपास करत आहेत. मुलीला शाळेतून बिबवेवाडीतील सोसायटीत सोडल्यानंतर हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झाले. सोमवारी सायंकाळी हिरे व्यापारी सिंहगड रस्ता भागातील नवले पूल परिसरात असल्याचे तांत्रिक तपासात आढळून आले. नंतर पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. नवले पूल परिसरात हिरे व्यापाऱ्याची दुचाकी पोलिसांना सापडली.
चालताना एक सीसीटीव्ही, कात्रज चौकात दिसतोय.
प्राथमिक चौकशीत दोन कोटींच्या खंडणीसाठी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याचे उघडकीस आले. गेल्या काही दिवसांपासनून ते आर्थिक विवंचनेत होते. त्यांनी काही जणांकडून पैसे घेतले होते. अपहरणामागचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यांनी घटनेच्या आदल्या दिवशी काहींना पैसे परत करतो असे सांगितले होते. पोलीस सीसीटीव्हीद्वारे शोध घेत आहेत.
हिरे व्यापाऱ्याचे अपहरण प्रकरणाचा तपास सर्व शक्यता गृहित धरून तपास करण्यात येत आहे. खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे. व्यापाऱ्याची सुखरुप सुटका करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत असून, गुन्हे शाखा, तसेच स्थानिक पोलिसांची पथकांकडून तपास करण्यात येत आहे.
– मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त