संग्रहित फोटो
मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट दोनने मुंबईत एका बांगलादेशी नागरिकाला भारतात बेकायदेशीरपणे राहिल्याबद्दल अटक केली आहे. १७ मार्च रोजी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात त्याचा सहभाग होता का? याचा तपास पोलिस करत आहेत. गुन्हे शाखेने दादर येथून अजीजुल निजाम उल रहमान (२९) याला ताब्यात घेतले आहे. हिंसाचाराच्या वेळी तो नागपूरमध्ये असल्याचा पोलिसांना संशय आहे. नागपूरमधील हसनबाग येथील रहिवासी रेहमान नुकताच दादरला आला होता.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, अटक करण्यात आलेला व्यक्ती रोजंदारीवर काम करणारा कामगार आहे. त्याने बनावट कागदपत्रांचा वापर करून आधार कार्ड मिळवल्याची कबुली दिली आहे. तपासाचा एक भाग म्हणून, अधिकारी त्याच्या मोबाईल फोन टॉवरच्या ठिकाणांचे विश्लेषण करत आहेत आणि त्याच्या अटकेची माहिती नागपूर पोलिसांसोबत शेअर केली आहे, असे त्यानी म्हटले आहे.
नागपूर दंगलप्रकरणी ११० हून अधिक जण अटकेत
१७ मार्च रोजी, मध्य नागपूरमधील एका जमावाने अफवा पसरवली की, छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या आणि बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनादरम्यान पवित्र शिलालेख असलेली ‘चादर’ जाळण्यात आली आहे. हिसाचाराच्या संदर्भात ११० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.