"निवडणूक आल्यावर त्यांना मराठी माणूस आठवतो...", दीपक केसरकर यांची उबाठावर टीका
मागील अडीच वर्षात मुंबईतील पायाभूत सुविधांचा विकास, मराठी माणसाला दिलेला न्याय आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमुळे यंदा मुंबईकर महायुतीच्या पाठिशी उभा राहील, असा विश्वास केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. सावरकरांचे विचार आणि सावरकरांवर सर्वाधिक टीका राहुल गांधी यांनी केली होती. सत्तेसाठी जेव्हा उबाठाने काँग्रेससोबत युती केली तेव्हा त्यांनी सावरकरांच्या विचारांना तिलांजली दिली, अशी खरमरीत टीका केसरकर यांनी केली. पूर्वी मुंबईतील खड्ड्यांवरुन गाणी बनायची मात्र आता त्याची आवश्यकत नाही. मुंबई लवकरच खड्डेमुक्त होईल, असे केसरकर म्हणाले.
केसरकर पुढे म्हणाले की, अंबरनाथ नगर परिषदेच्या निकालानंतर सर्वाधिक २७ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेने युतीचा प्रस्ताव भाजपला पाठवला होता, तो जर स्वीकारला असता तर तिथे महायुतीची सत्ता आली असती, मात्र भाजपने शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवून काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला, तो का घेतला याचे आत्मपरिक्षण करायला हवे. शिवसेना २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष असून देखील सत्तेबाहेर आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत जाण्याचा भाजपने निर्णय का घेतला, त्यावर तेच उत्तर देऊ शकतात, असे केसरकर म्हणाले. मात्र महाराष्ट्रात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती मजबूत आहे आणि मुंबईतही महायुतीचा विजय होईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. शिवसेना युती धर्माचे पालन १०० टक्के करत आलोय आणि भविष्यात करु, असे केसरकर म्हणाले.
शिवसेना, भाजप आणि महायुतीने ज्यांच्याविरोधात निवडणुका लढल्या त्यांच्यासोबत केवळ सत्तेच्या लालसेपोटी स्थानिक पातळीवर काही नेत्यांनी काँग्रेससोबत युती केली असेल तर ते योग्य नाही. यावर भाजपच्या वरिष्ठांनी कारवाई करायला हवी, अशी मागणी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी खासदार डॉ. शिंदे यांनी शहरात दोन रोड शो केले.






