सौजन्य - सोशल मिडीया
पिंपरी : पतीसमोर पतीच्या संमतीने सासरा सुनेवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथे उघडकीस आला आहे. सुनेच्या नावाने डेटिंग साईटवर बनावट प्रोफाइल बनवून तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचेही उघडकीस आले आहे. यासाठी विवाहितेने विरोध केला असता तिला मुलांसह घराबाहेर काढण्यात आले.
पीडित महिलेचा १६ वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. तिचे कुटुंब भोसरी येथे वास्तव्यास होते. दरम्यान मागील दोन वर्षांपासून तिचा सासरा तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. यासाठी महिलेच्या पतीची देखील संमती असे. त्यानंतर पती आणि सासऱ्याने मिळून महिलेच्या नावाने डेटिंग साईटवर बनावट प्रोफाइल तयार केले. साईटवरुन वेगवेगळ्या पुरुषांसोबत वेश्या व्यवसाय करण्यास पती आणि सासऱ्याने प्रवृत्त केले. महिलेने देह विक्रीचा व्यवसाय करण्यास नकार दिला असता पती आणि सासऱ्याने तिला अमानुषपणे मारहाण केली. तर तिला मुलांसह घराबाहेर हाकलून देण्यात आले. आता ती महिला बेघर झाली आहे. महिलेने मुंबई मध्ये टिळक नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा गुन्हा भोसरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पती आणि सासऱ्याला अटक केली आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चाललंय काय? व्हाट्सअॅपवर डीपी ठेवल्याने तरुणावर कोयत्याने सपासप वार
राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले
राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव सनी पॅलेसस्थित आशिष गीते (वय 26) याने एका 24 वर्षीय विवाहितेचा फेसबुकवरील ओळखीचा फायदा घेत तिला बोलाविले व तिला मोटरसायकलवर बसवून शेगाव रोडने सनशाईन कॅफेवर नेले. त्या ठिकाणी तुझ्यासोबत फारकती झाल्यानंतर लग्न करेन, असे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलू नको’, असे म्हणून पीडित विवाहितेचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. अशा तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.