सौजन्य - सोशल मिडीया
कोल्हापूर : इतिहासकार इंद्रजित सावंत यांना नागपुरातील प्रशांत कोरटकरने दिलेली जिवे मारण्याची धमकी ताजी असतानाच आता पुन्हा एकदा नव्याने धमकी देण्यात आली आहे. आता त्यांकॉमेंटमधून धमकी दिली आहे. सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू, अशी नव्याने धमकी दिली आहे. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली आहे. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने युट्युब चॅनेलच्या कॉमेंटमधून धमकी दिली आहे.
इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यानंतर तो मी नव्हेच असा दावा करणारा प्रशांत कोरटकर फरार का झाला? याचे उत्तर अजून मिळालेले नाही. कोल्हापूर पोलिसांनी नागपुरात कोरटकरच्या घरात पाहणी करून माग काढण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. तो मध्य प्रदेशातील बालाघाटला फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांचे एक पथक तिकडे रवाना झालं आहे. धमकी मी दिली नाही म्हणणाऱ्या कोरटकरने अटकपूर्व जामीनासाठी पळापळ सुरु केल्याचे बोलले जात आहे.
२४ फेब्रुवारीच्या रात्रीला प्रशांत कोरटकर नावाने इंद्रीजीत सावंत यांना धमकीचा फोन आला. २५ फेब्रुवारीच्या सकाळी इंद्रजीत सावंत यांची सोशल मीडियावर प्रशांत कोरटकरने धमकी दिल्याची क्लिप पोस्ट केली. सोशल मीडियावर क्लिप वायरल होताच प्रशांत कोरटकरला राज्यभरातून फोन यायला सुरवात झाली. सकाळी मुलीला परीक्षा केंद्रावर सोडायला जात असताना त्यांनी मीडियाशी बोलून तो आवाज आपला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून आपल्याला धमकी येत असल्याचे सांगत सुरक्षेची मागणी केली.
खबरदारी म्हणून नागपूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरच्या मनीषनगर येथील घरावर पोलिसांचा बंदोबस्त लावला. २५ फेब्रुवारीला मुलीला परीक्षा केंद्रावर सोडायला गेल्यानंतर प्रशांत कोरटकर घरी परतला नाही. २५ फेब्रुवारीच्या दुपारनंतर फोन सुद्धा बंद केला. प्रशांत कोरटकर शिवनी, बालाघाटमार्गे मध्य प्रदेशला गेल्याचा दावा केला जात आहे. यानंतर पुढे देवदर्शन केल्याची माहिती आहे. सध्या प्रशांत कोरटकरचा फोन बंद असून, एका ठिकाणी खूप वेळ मुक्काम करत नाही. सतत प्रवास करत असून या प्रवासात देवदर्शन व पर्यटन करत पोलिसांना हुलकावणी देत आहे. सध्या नागपूर पोलिसांचे दोन पथक व कोल्हापूर पोलिसांचे एक पथक असे तीन पथके प्रशांत कोरटकर यांचा शोध घेत आहे. प्रशांत कोरटकर हे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळत आहे.