सौजन्य - नवराष्ट्र टीम
कोल्हापूर : वधू-वर सूचक संकेतस्थळावरून महिलांशी जवळीक साधून त्यांची फसवणूक करणाऱ्या फिरोज निजाम शेख (वय ३२, रा. कोंढवा, पुणे) याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. जिल्ह्यातील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवत त्याने ११ तोळे दागिन्यांसह अकरा लाखांचा गंडा घातला.
या ‘लखोबा’ने राज्यभरातील तीसहून अधिक महिलांची फसवणूक केल्याचे समोर येत असून, त्याच्याकडील दागिन्यांच्या जप्तीसाठी पोलीस तपास गतिमान करण्यात आला आहे. संशयित शेख याने ऑनलाईन ओळखीतून जिल्ह्यातील एका घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. व्यवसायात अडचणी, प्राप्तीकर विभागाची कारवाई, आजारपणाचे कारण काढून पीडितेकडून ११ तोळे दागिने व रोख एक लाख ६९ हजार रुपये उकळल्याचे समोर आले.
पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली आहे. पोलिसांनी मंगळवारी संशयिताकडे चौकशी सुरू केली. दिवसभर त्याची चौकशी सुरू होती. पीडित महिलेलाही बोलाविण्यात आले होते. यावेळी संबंधित महिलेचा राग अनावर झाला. पोलिसांनी मध्यस्थी करून पीडितेला बाजूला नेत तिचा राग शांत केला.
हे सुद्धा वाचा : दुकान फोडून साहित्य चोरणारा अटकेत; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त
मराठी येत नसल्याचा फायदा घेऊन फसवणूक
राज्यात फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली महिलेला मराठी येत नसल्याचा गैरफायदा घेत चार हजार चैारस फुटाचा बनावट दस्त तयार करून तो हडपण्याचा प्रयत्न करून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिला मूळची कर्नाटक येथील असून, तिला पत्र व्यवहार करण्यासाठी म्हणून संमतीपत्र घेतो असे सांगत कुलमुखत्यार पत्र घेऊन ही फसवणूक केली.
याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी तुषार हिम्मत कवडे (रा. श्रीनाथनगर, बालाजी मंदीराजवळ, घोरपडी) याला अटक केली आहे. त्याला १७ जानेवारीपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणात त्याचे इतर दोन साथीदार पॉल पिटर पलेरो (रा. घोरपडी) आणि सुरेश त्रिंबक पाळवदे (रा थिटेवस्ती, खराडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सलोनी मारिया जॉन डिसुझा (27, रा. सिसिलीया, पिथ्रोडी, कर्नाटक व श्रीनाथनगर घोरपडी गाव) यांनी याबाबत मुंढवा पोलिसांत तक्रार दिली आहे. हा प्रकार २४ एप्रिल ते २ ऑगस्ट २०२४ दरम्यान घडला. याप्रकरणात २२ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.