Crime News Live Updates
बेळगावात एका खुनाचा गुंता सोडवण्यात पाळीव प्राण्यांनी मदत केल्याचे अनोखे प्रकरण उघडकीस आले आहे.इथे एका मेंढपाळाच्या निर्घृण खुनाचा तपास मानव पुरावे गहाळ असतानाही पाळीव प्राण्यांच्या वागणुकीवरून करण्यात आला. या गुंत्यात जेव्हा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, ना मोबाईल लोकेशन, ना सीसीटीव्ही पोलिसांची एकही साधी माहिती उपयोगी आली नाही, तेव्हा खरा शोध बकरी आणि कुत्र्यांनी लावला.
17 Jun 2025 05:28 PM (IST)
नवी मुंबई मनपाच्या वाशी येथील रुग्णालयातील शवागरा मधील कर्मचाऱ्याने मृतदेह चांगल्या कपड्यात गुंडाळण्यासाठी लाच मागितली होती.या दोन हजाराची लाच घेतानाचा विडिओ व्हायरल झाला.आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या मुलीच्या कुटुंबियांकडूनच लाच मागितल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मनसेने रुग्णालय अधिकाऱ्यांना कार्यालयात जात जाब विचारला होता. मनसेने आक्रमक होत कंत्राटदारास ब्लॅकलिस्टेड करण्याची मागणी तसेच कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
17 Jun 2025 05:04 PM (IST)
नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हे विमान कोचीनवरून दिल्लीकडे चालले होते. मात्र अचानक या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. इंडिगोच्या 6E 2706 फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने या फ्लाइटचे नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. दरम्यान विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.
17 Jun 2025 04:35 PM (IST)
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येरवड्यात उधारीवर दारू न दिल्याने एका वाईन शॉपच्या काचा फोडून तीक्ष्ण हत्यार फेकून मारत तुफान राडा घालण्यात आल्याची घटना घडली आहे. फेकलेल्या तीक्ष्ण हत्याराने एक कामगार गंभीररित्या जखमी देखील झाला. रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
17 Jun 2025 04:20 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा अशाच प्रकारचा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. शेतीमधील बांधाच्या वादावरून तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. ‘तुझा संतोष देशमुख करतो…’, अशी धमकीही देण्यात आली. कैलास सांगुळे असं जखमी तरूणाचं नाव आहे. तो बीड तालुक्यातील तांदळवाडी भिल्ल येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. काही कामानिमित्त कैलास त्याच्या दुचाकीने निघाला होता. त्यावेळी चार जणांनी त्याची वाट अडवली. या चौघांनी कैलास याच्यावर कोयत्याने डोक्यावर, मानेवर आणि तोंडावर जबरदस्त हल्ला केला. तसेच हल्लेखोरांनी ‘तुझा संतोष देशमुख करतो, याला जीवे मारा’ अशी धमकीही दिली. या हल्ल्यानंतर तरुण जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
17 Jun 2025 03:10 PM (IST)
एका धक्कादायक घटनेने जळगाव जिल्हा हादरला आहे. जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यात एका १३ वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याची घटना खर्ची गावात घडली आहे. हि घटना नरबळीसाठी तर झाली नाही ना? असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. तेजस महाजन असे मृत झालेल्या १३ वर्षीय मुलाचे नाव आहे.
17 Jun 2025 02:25 PM (IST)
शिरूर तालुक्यातील मानूर जवळील तुपे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोराने सशस्त्र दरोडा टाकत पती पत्नीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भगवान तुपे यांच्या घरी घडली आहे. आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावत भगवान तुपे यांच्या घराचे दार तोडूनच प्रवेश केला. आणि त्यानंतर जे घडलं ते खूप धक्कादायक घडलं.
17 Jun 2025 01:05 PM (IST)
राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून, कोथरूड भागातील वेदभवन परिसरात पहाटे विचीत्र अपघाताची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, एसटी बसचा चालक अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची सुखरूप सुटका केली. परंतु, त्याच्या पायाला मार लागल्याचे सांगण्यात आले आहे. उत्तम कोकरे (वय ५०, रा. पुणे) असे जखमी झालेल्या एसटी बस चालकाचे नाव आहेत. याप्रकरणी पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
17 Jun 2025 11:51 AM (IST)
गुंड टीपू पठाण टोळीतील सराईत गुन्हेगार शाहरुख ऊर्फ अट्टी शेखच्या एन्काऊंटरनंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, त्याच्याशी संबंधित तब्बल ६० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर दाखल गुन्ह्यांतील सहआरोपी, टोळीतील सदस्य आणि त्याच्या मृत्यूनंतर श्रद्धांजलीच्या नावाखाली गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे ‘रील’ बनवणाऱ्या तरुणांचा यात समावेश आहे.
17 Jun 2025 11:28 AM (IST)
वडगावशेरी भागात सोमनाथ नगरमध्ये प्रतिबंधित व जीवघेणा ठरू शकणाऱ्या इंजेक्शनची विनापरवाना विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अमीर अनिस खान (वय ३०, रा. वडगावशेरी) असे आरोपीचे नाव आहे. इंजेक्शनचा नशेसाठी वापर केला जात होता. याप्रकरणी विश्वनाथ शंकर गेणे (वय ४५, पोलिस हवालदार, चंदननगर पोलिस ठाणे) यांनी चंदननगर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
17 Jun 2025 11:21 AM (IST)
बदलापुरातल्या कात्रप परिसरात देवराज ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. रात्री तीनच्या सुमारास दोन ते तीन चोरटे गाडीतून आले. त्यांनी दुकानाचे शटर तोडलं आणि दुकानात प्रवेश केला. मात्र त्याचवेळी दुकानाचा सायरन वाजला. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी लगेचच तिथून पळ काढला. दरम्यान दुकानाचे मालक त्या ठिकाणी पोहोचले मात्र त्यापूर्वीच चोरटे पसार झाले होते. चोरट्यांचा हा कारनामा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
17 Jun 2025 11:05 AM (IST)
जळगाव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आरोपींचा पाठलाग करत असतांना आरोपींनी पोलीस उपनिरीक्षकांच्या अंगावर गाडी घातली. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत असतांना आरोपींकडून चारचाकी रिव्हर्स घेत संदीप पाटील यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दुखापत झाली. त्यांच्या बोटाला, पायाला आणि पोटाजवळील बारगड्यांना दुखापत झाली आहे. या घटनेत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेला बैल. चारचाकी वाहन, छोटी तलवार, गुप्ती तसेच लोखंडी रॉड आदी जप्त करण्यात आलं आहे.