Crime News Live Updates
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातल्या बुब पेट्रोलपंप येथे एका सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान दोन जणांकडून ही जबर मारहाण झाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या मारहाणीचे मूळं कारण समोर आलं नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावाचे सरपंच प्रदीप फुके हे दैनंदिन कामे आटपून गावी जात होते, वाटेतच पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबले. त्याचवेळी रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून हा वाद झाला आणि या वादादरम्यान सरपंच फुके यांना 2 व्यक्तींनी मारहाण केली. हा मारहाणीचा प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकरणात मुर्तीजापुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
14 Aug 2025 06:56 PM (IST)
शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे उंदीर मारण्याचे औषध पाण्यात मिसळलेले पाणी चुकून पिऊन १७ वर्षीय अल्पवयीन युवतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.महादेव काळे यांच्या घरात उंदीर झाल्याने त्यांच्या पत्नी सविता यांनी उंदीर मारण्याचे औषध पाण्यात टाकून ठेवले होते. यावेळी झोपेत असलेली त्यांची मुलगी भक्ती उठली आणि तहान लागल्याने चुकून ते पाणी पिले. काही वेळातच तिची प्रकृती बिघडल्याने प्रथम कारेगाव व नंतर शिरुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान भक्तीने चुकून उंदरांचे औषध टाकलेले पाणी पिल्याचे स्पष्ट झाले. मात्र, उपचार सुरू असतानाच भक्ती महादेव काळे (वय १७, रा. कारेगाव, ता. शिरुर) हिचा मृत्यू झाला.
14 Aug 2025 05:57 PM (IST)
रत्नागिरी: राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मोठ्या मंदिरांमध्ये ड्रेसकोड सक्तीचा केला गेला आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील श्री देव गणपतीमुळे मंदिर संस्थानाने देखील अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे. गणपतीपुळे मंदिरात भाविकांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. भाविकांसाठी वेशभूषा नियमावली तयार करण्यात आली आहे.
14 Aug 2025 05:45 PM (IST)
आंबेगाव तालुक्यातील जवळे येथे गॅस लिकेजमुळे लागलेल्या आगीत शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबाचे घर आणि घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. ही घटना बुधवार (दि. १३) रोजी रात्री घडली असून अंदाजे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अनिल भरत गावडे आणि भरत कृष्णा गावडे यांच्या घरातील गॅस संपल्याने त्यांनी नवीन सिलेंडर आणून टाकी जोडली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रेग्युलेटरजवळ गॅस लिकेज झाल्याने गॅस पेटवल्यानंतर आगीचा भडका उडाला. कौलारू लाकडी घर असल्याने आग वेगाने पसरली आणि जवळपास एक तास धुमसत राहिली. या आगीत टीव्ही, गॅस, धान्य, कपडे, इलेक्ट्रिक वस्तू, मुलांच्या शालेय वस्तूंसह देवाचा देव्हारा देखील जळून खाक झाला. लाकडी वासे जळून कौले खाली पडली. सुदैवाने गॅस सिलेंडरचा स्फोट झाला नाही आणि मोठी दुर्घटना टळली.
14 Aug 2025 05:25 PM (IST)
इंदापूर तालुक्यात श्रेयविषयक वादातून झालेल्या उत्तम जाधव यांच्या निर्घृण खून प्रकरणात आरोपी टोळीप्रमुखासह १२ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यात अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत दिली. जंक्शन (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेस अप्पर पोलीस अधीक्षक बिरादार, तपासी अधिकारी डीवायएसपी डॉ. सुदर्शन राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी तयार केलेला मोक्का कारवाईचा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्फत कोल्हापूर परिक्षेत्राकडे पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने कारवाईची अंमलबजावणी झाली आहे.
14 Aug 2025 05:18 PM (IST)
आशियाई बाजारातील संमिश्र ट्रेंडमध्ये गुरुवारी (१४ ऑगस्ट) भारतीय शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद झाले. आयटी आणि ग्राहकोपयोगी टिकाऊ समभागांमध्ये वाढ झाल्यामुळे बाजार हिरव्या रंगात बंद झाला. तथापि, युक्रेन युद्धावर रशिया आणि अमेरिका यांच्यातील चर्चेपूर्वी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका स्वीकारली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर रशिया आणि अमेरिका यांच्यातील चर्चा अयशस्वी झाली तर भारताला अधिक शुल्क आकारले जाऊ शकते.
14 Aug 2025 05:00 PM (IST)
पुणे शहरात घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरटे दररोज राज्यासह देशातील वेगवेगळ्या भागात बंद घरांना टार्गेट करुन लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुण्यातून चोरीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सिंहगड रोड भागातील गणेशमळा परिसरात तसेच कोंढवा बिबवेवाडी रोडवरील सोसायटीत झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ११ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांवर पर्वती आणि कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
14 Aug 2025 04:55 PM (IST)
देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खालापूर नगरपंचायत यांच्या वतीने दिनांक 14 ऑगस्ट रोजी तिरंगा यात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विठू नामाच्या गजरात व भारत मातेच्या जयघोष खालापूर शहरात करण्यात आला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 वी जयंती चे औचित्य साधत पालखीचे आयोजनही करण्यात आले.
विठुरायची पालखी व हातात तिरंगा घेऊन यात्रेची सुरवात स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांना अभिवादन करून खालापूर शहरात मार्गक्रमण करत खालापूर तहसील कार्यालय येथे यात्रेचा समारोप करण्यात आला.
14 Aug 2025 04:20 PM (IST)
पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात एक विचीत्र अपघात घडला आहे. मैत्रिणीला घेऊन दुचाकीने निघालेल्या तरुणाला पाठिमागून आलेल्या दुसऱ्या दुचाकी चालकाने धडक दिली. यामध्ये तो तरुण आणि त्याची मैत्रिण खाली कोसळले. तेव्हा पाठीमागून येणाऱ्या भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तो तरुण सापडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवम सिंग (वय २२, रा. एअरफोर्स स्टेशन, विमाननगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वारासह टेम्पोचालक इंद्रजीत संजय नरोटे (रा. येवलेवाडी, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवम सिंग याची बहीण नेहा (वय २०) हिने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
14 Aug 2025 04:07 PM (IST)
Pooja Pal out From Samajwadi Party : पाटणा : उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये जोरदार राजकारण तापले आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. मात्र हे कौतुक भाजप नेत्यांनी नाही तर समाजवादी पक्षाच्या महिला नेत्यांनी केल्यामुळे वाद वाढला आहे. सपाच्या आमदार पूजा पाल यांना पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. पक्षाने त्यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
14 Aug 2025 04:00 PM (IST)
सिंहगड रोड पोलिसांच्या तपास पथकाने मोठी कारवाई केली आहे. घरफोड्या करणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला सिंहगड रोड पोलिसांनी बेड्या ठोकत त्याच्याकडून ८ गुन्ह्यांची उकल केली आहे. त्याने घरफोडीतील चोरीच्या पैशांमधून एक कार देखील खरेदी केली असल्याचे तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून कारसह १४ लाख ७५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. रेवण उर्फ रोहन बिरू सोनटक्के (वय २४, रा. दिघी, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून सिंहगडमधील चार, उत्तमनगरमधील दोन आणि विमानतळ व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक अशा ८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, निलेश भोरडे, गणेश झगडे, समीर माळवदकर व त्यांच्या पथकाने केली आहे.
14 Aug 2025 03:40 PM (IST)
चंदननगर भागात चुलतीला आय लव यू म्हणाल्याचा रागातून तरुणाचा दोघांनी हॉकी स्टिक आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. चंदननगर येथील भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय २१), समर्थ उर्फ करण पप्पू शर्मा (वय २१, दोघे रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांना अटक करण्यात आली. याबाबत पोलीस हवालदार राहुल गिरमे यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
14 Aug 2025 03:20 PM (IST)
वर्क फ्रॉर्म होमच्या आमिषाने एका तरुणाची १० लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबात ३४ वर्षीय तरुणाने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या तरुणाला देखील माहिती एक मॅसेज पाठविला होता. त्या माहितीवरून तरुणाने सायबर चोरट्यांशी संपर्क साधला. त्याला ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल,असे आमिष दाखविले. चोरट्यांनी तरुणाला जाळ्यात ओढले. सुरुवातील परतावा दिल्याने तरुणाचा विश्वास बसला. तरुणाने वेळोवळी १० लाख ६७ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने चोरट्यांच्या खात्यात जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसंकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक शरद शेळके तपास करत आहेत.
14 Aug 2025 02:40 PM (IST)
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या नावाने बनावट जाहिरातीद्वारे फसवणूक केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवर बनावट जाहिरात पोस्ट करून आणि आमिष दाखवून मराठा प्रवर्गात नसलेल्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळलीये. तसेच बनावट कर्ज प्रकरण मंजूर करत अनुदान लाटल्याचे देखील समोर आले आहे. या प्रकरणात सुमारे ५ लाख ६३ हजार १६० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ही फसवणूक ५ जणांच्या टोळीने केली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
14 Aug 2025 02:20 PM (IST)
धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून पती- पत्नीची भर रस्त्यावर निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी गाडीला धडक दिली. नंतर पती पत्नी खाली पडताच कोयत्याने वार करत पती- पत्नीची हत्या केली. हा प्रकार धाराशिव तालुक्यातील करजखेडा पाटोदा चौकात बुधवारी सकाळी ही घटना घडली. हत्येनंतर दोन्ही संशयित आरोपी फरार असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
14 Aug 2025 02:00 PM (IST)
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत चालली आहे. सतत हत्या, हाणामारी, ड्रग्स या सारख्या गुन्ह्याच्या बातम्या दिवसेंदिवस समोर येत आहे. आता पिंपरी चिंचवडमधून हत्येची एक घटना समोर आली आहे. एका जिम ट्रेनर तरुणीने मित्राच्या मदतीने एका युवकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या झालेला तरुण हा जिमट्रेनर तरुणीला वारंवार त्रास देत होता. त्यातून ही घटना घडली असल्याचं आतापर्यंतच्या प्राथमिक पोलीस तपासात समीर आलेलं आहे.
14 Aug 2025 01:40 PM (IST)
नागपूरमधून एक चोरीची घटना समोर आली आहे. आजारी आईच्या उपचारासाठी न्यायालयाच्या फौजदारी विभागातील महिला लिपिकाच्या कार्यालयात ठेवलेल्या बॅगमधून ३५ हजार रुपये चोरी केली. पोलिसांनी कळमेश्वर येथील एका अस्थायी कर्मचाऱ्याला अटक केली आहे. प्रणय थोरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.
14 Aug 2025 01:20 PM (IST)
नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साधूंच्या वेशात तीन भामटे आले आणि दीक्षा देण्याच्या बहाण्याने एका महिलेला भुरळ घालून तब्बल २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रॉड परिसरातील पाटील पार्कमधील श्रीकृष्ण मंदिराच्या मागील गल्लीत घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
14 Aug 2025 01:05 PM (IST)
सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांना गंडा घालत असून, पुन्हा शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागिरकाची ३० लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांकडून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक धनकवडीत राहतात. सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी त्यांना मोबाइलवर मॅसेज पाठवून शेअर बाजारातील गुंतवणूकीची माहिती दिली होती. त्यात गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळेल, असे सांगितले होते. या आमिषाला ज्येष्ठ नागरिक बळी पडले. त्यांनी गुंतवणूक केली. सुरुवातीला काही रक्कम परतावा म्हणून दिली देखील. त्यामुळे त्यांचा आणखीनच विश्वास बसला. नंतर मात्र, ज्येष्ठाने दीड ते दोन महिन्यात वेळोवेली ३० लाख ४५ हजार रुपये गुंतविले. रक्कम गुंतविल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आली नाही. त्यांना संपर्क साधला असता त्यांचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल पवार तपास करत आहेत.
14 Aug 2025 01:00 PM (IST)
नांदेड पोलिसांनी स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वैश्य व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि त्यानंतर छापा टाकून धंद्यात गुंतलेल्या महिलांसह अनेकांना अटक केली आहे. हा प्रकार नांदेडमधील गजबजलेल्या तरोडेकर मार्केट परिसरात उघडकीस आला आहे.
14 Aug 2025 12:45 PM (IST)
पुणे- सोलापूर महामार्गालगत कदमवाकवस्ती (कवडीपाठ) येथील राजधानी बेकरीमध्ये विक्रीस असलेल्या केकमध्ये आळ्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुलांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बेफिकीर व्यावसायिकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. स्थानिक महिलेने आपल्या लहान मुलांसाठी राजधानी बेकरीतून केक खरेदी केला. घरी गेल्यानंतर केक कापल्यावर त्यामध्ये आळ्या असल्याचे दिसून आले. हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच पालक व नागरिकांनी बेकरीवर धाव घेत तीव्र निषेध व्यक्त केला.
14 Aug 2025 12:25 PM (IST)
तासगाव तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तासगावच्या मध्यवर्ती बसस्थानक चौकात दुपारची गर्दी… वाहनांचा कलकलाट, हॉर्नचा आवाज, आणि उन्हाच्या तडाख्यात उभ्या असलेल्या महिला वाहतूक पोलिस नेहमीप्रमाणे वाहतुकीची शिस्त राखण्याचा प्रयत्न करत होत्या. पण याच वेळी, एका चारचाकी वाहनातून उतरलेल्या तरुणाने भर चौकात गोंधळ घातला. महिला पोलिसाशी गैरवर्तन केले. शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जत तालुक्यातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल दिपाली उत्तम खरात या सोमवारी 12.30 वाजताच्या दरम्यान बसस्थानक चौकात आपले कर्तव्य बजावत होत्या. त्याचवेळी अमोल विष्णु काळे (वय 30, रा. काशलींगवाडी, ता. जत, जि. सांगली) हा MH-05-AJ-9977 क्रमांकाच्या मारुती सुझुकी कारसह आला. यावेळी खरात यांनी काळे याची गाडी थांबवली. मात्र गाडी का थांबवली असे म्हणत काळे याने खरात यांच्याशी गैरवर्तन केले. शासकीय कामात अडथळा आणत, लोकांसमोर पोलिसांबद्दल चुकीचा संदेश जाईल, असे वक्तव्य केले.
14 Aug 2025 12:05 PM (IST)
हिंजवडी पांडवनगर येथे अतिक्रमणाबाबत चर्चा सुरू असताना हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पी आय) बालाजी पांढरे यांनी शेतकरी बांधवांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुपारी साधारण २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत शेतकरी, पीएमआरडीचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक अतिक्रमणाच्या मुद्यावर चर्चा करत होते. त्याचवेळी वरिष्ठ पांढरे यांनी चर्चेत हस्तक्षेप करून काही शेतकऱ्यांना ढकलले आणि अश्लील भाषेचा वापर केल्याचा आरोप आहे. अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश महासचिव मनोज मोरे यांनी सांगितले की, “वरिष्ठ पीआय पांढरे यांचे वर्तन अशोभनीय असून, हा पोलिस बळाचा गैरवापर आहे. पीएमआरडीचा कारभार शेतकऱ्यांना हानी पोहोचवणारा आणि बिल्डर लॉबीला पोषक आहे. सरकारने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून निर्णय घ्यावा.”
14 Aug 2025 11:47 AM (IST)
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कौटुंबिक तसेच वैवाहिक वादातून विवाहितेने सोमवारी (११ ऑगस्ट) रात्री कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मात्र, पर्वती दर्शन पोलिस चौकीच्या बीट मार्शलवरील पोलिसांनी या महिलेचे धाडसाने प्राण वाचविले. पोलिसांच्या धाडसाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. बीट मार्शल किरण पवार आणि राहुल उनाळे असे या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ही घटना घटना रात्री साडेअकराच्या सुमारास स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे घडली आहे.