Crime News Live Updates
भिवंडी तालुक्यातील खारबाव-चिंचोटी रस्त्यावरील खार्डी गावात रात्री दोन तरुणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचे सहकारी तेजस तांगडी यांचा मृत्यू झाला. हत्या घडल्याच्या ठिकाणी तात्काळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. व्यावसायिक कारणातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर प्रफुल्ल तांगडी यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्यावर देखील प्रफुल्ल तंगडी यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केलाय.
12 Aug 2025 06:00 PM (IST)
पुणे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेली जुगार खेळताना भाजपचा पदाधिकारी आढळून आला. जुगार खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची आणि सहकारनगर पोलिसांनी ही छापेमारी केली होती, औदुंबर विठ्ठल कांबळे असे या भाजपच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. कांबळे याच्यासोबत इतर 2 ते 3 जण जुगार खेळत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12 Aug 2025 05:50 PM (IST)
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचा ‘पी.ए.’ असल्याचे भासवून तब्बल 5 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका तोतया गँगचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखा आणि लष्कर पोलिस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत तिघांना रंगेहाथ पकडले. या गँगने थेट व्यावसायिकाला फोन करून ‘डॅडी’च्या नावाने पैसे मागितले होते.
12 Aug 2025 05:35 PM (IST)
वडगाव मावळमध्ये गुन्हेगारीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मावळ तालुक्यात अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. हीच बाब पोलिसांसमोर मोठी डोकेदुखी ठरत आहे. अशातच उर्से गावच्या हद्दीत सव्वा लाख रुपयांचे मेफेड्राॅन (एम. डी) ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई सोमवारी (दि ११ ) रोजी दुपारच्या सुमारास फिनोलेक्स कंपनीसमोरील ब्रिजजवळ करण्यात आली आहे. याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. समेश राजू तिकोणे (वय. २१.राहणार. कान्हे फाटा ता.मावळ जि.पुणे ) असे पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रसाद राजन्ना जंगीलवाड यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
12 Aug 2025 05:22 PM (IST)
म्हसवड येथील पंढरपुर रोडवर असलेल्या नायरा पेट्रोल पंपानजीक भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ओंकार रमेश खांडेकर (वय १९ ) याचा जागीच मृत्यू झाला असून, याप्रकरणी ट्रकचालक विजय शाहु माने याला म्हसवड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
12 Aug 2025 05:00 PM (IST)
तासगाव तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तासगावच्या मध्यवर्ती बसस्थानक चौकात दुपारची गर्दी… वाहनांचा कलकलाट, हॉर्नचा आवाज, आणि उन्हाच्या तडाख्यात उभ्या असलेल्या महिला वाहतूक पोलिस नेहमीप्रमाणे वाहतुकीची शिस्त राखण्याचा प्रयत्न करत होत्या. पण याच वेळी, एका चारचाकी वाहनातून उतरलेल्या तरुणाने भर चौकात गोंधळ घातला. महिला पोलिसाशी गैरवर्तन केले. शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जत तालुक्यातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल दिपाली उत्तम खरात या सोमवारी 12.30 वाजताच्या दरम्यान बसस्थानक चौकात आपले कर्तव्य बजावत होत्या. त्याचवेळी अमोल विष्णु काळे (वय 30, रा. काशलींगवाडी, ता. जत, जि. सांगली) हा MH-05-AJ-9977 क्रमांकाच्या मारुती सुझुकी कारसह आला. यावेळी खरात यांनी काळे याची गाडी थांबवली. मात्र गाडी का थांबवली असे म्हणत काळे याने खरात यांच्याशी गैरवर्तन केले. शासकीय कामात अडथळा आणत, लोकांसमोर पोलिसांबद्दल चुकीचा संदेश जाईल, असे वक्तव्य केले.
12 Aug 2025 05:00 PM (IST)
नवी मुंबईतील चैन चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी कोपरखैरणे पोलिसांनी कारवाई करत बस डेपो येथे सापळा रचून सराईत आरोपी ऋतिक उर्फ राजू गोविंद मोरे (वय 26) याला अटक केली. तपासात त्याने दोन चोरीची कबुली दिली असून पोलिसांनी 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
12 Aug 2025 04:40 PM (IST)
पुणे- सोलापूर महामार्गालगत कदमवाकवस्ती (कवडीपाठ) येथील राजधानी बेकरीमध्ये विक्रीस असलेल्या केकमध्ये आळ्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुलांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बेफिकीर व्यावसायिकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. स्थानिक महिलेने आपल्या लहान मुलांसाठी राजधानी बेकरीतून केक खरेदी केला. घरी गेल्यानंतर केक कापल्यावर त्यामध्ये आळ्या असल्याचे दिसून आले. हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच पालक व नागरिकांनी बेकरीवर धाव घेत तीव्र निषेध व्यक्त केला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे यांच्या नेतृत्वाखाली पथक पाठवले.
12 Aug 2025 04:30 PM (IST)
आयकोडेक्स पब्लिशिंग सोल्युशन्सचा आयपीओ ११ ऑगस्ट रोजी उघडला आणि ४२.०३ कोटी रुपये उभारले. या इश्यूमध्ये ३४.६४ कोटी रुपये उभारण्यासाठी ३३.९६ लाख शेअर्सचा नवीन इश्यू समाविष्ट आहे, तर ७.२५ लाख शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे ७.३९ कोटी रुपये उभारले जातील. पहिल्या दिवशी, हा IPO चांगला सबस्क्राईब झाला. किरकोळ श्रेणीला ३३ टक्के, NII श्रेणीला ७५ टक्के आणि QIB श्रेणीला १०० टक्के सबस्क्रिप्शन मिळाले. दुसऱ्या दिवशी, दुपारी १:५० पर्यंत, या अंकाची सदस्यता ६९ वेळा घेण्यात आली आहे. किरकोळ श्रेणीला ८८ टक्के, NII श्रेणीला ५५ टक्के आणि QIB श्रेणीला आतापर्यंत १०० टक्के बुकिंग करण्यात आले आहे.
12 Aug 2025 04:20 PM (IST)
पर्वती परिसरातील मित्रमंडळ चौकात असलेले हार्डवेअरचे दुकान चोरट्यांनी फोडले. दुकानातून चोरट्यांनी रोकड आणि बॅटरी असा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी ३८ वर्षीय व्यावसायिकाने पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार हे व्यावसायिक असून, ते सहकारनगर भागात राहतात. त्यांचे मित्रमंडळ चौकात हार्डवेअरचे दुकान आहे. रविवारी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड आणि बॅटरी असा १ लाख ७६ हजारांचा ऐवज चोरला. सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.
12 Aug 2025 04:15 PM (IST)
कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथील माळरानावर असलेल्या घरामध्ये एमडी हे अमली पदार्थ बनविले जात होते.स्थानिक ग्रामस्थानी रात्री त्या सर्व पाच जणांना पकडून नेरळ पोलिसांच्या ताब्यात दिले होते.दरम्यान या सर्व आरोपींवर अमली पदार्थ विरोधी कायद्याखाली कारवाई करण्यात आली असून पाच जणांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे,तर घर भाड्याने देणारा स्थानिक आदिवासी व्यक्ती फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
12 Aug 2025 04:00 PM (IST)
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दुचाकीस्वार चोरट्यांनी एका दाम्पत्याला अडवून त्यांना पुढे चेकींग सुरू असल्याची बतावणी करून अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगत ते हातचालाखीने चोरून पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. वारजे माळवाडी येथील हरीभाऊ पाटलू चौधरी चौकात ही घटना घडली आहे. याप्रकरणी ५८ वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे रस्त्यावर चोऱ्या करत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरत आहे.
12 Aug 2025 03:54 PM (IST)
क्रिकेट सामन्यांमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. कधी विक्रमांची झडी लागते तर कधी विक्रमांचा दुष्काळ असतो. कधी अशी काही एक घटना घडते की ते पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. टी-२० सामन्यात अशा अनेक घटना घडत असतात. कधी एखाद्या सामन्यात धावांचा डोंगर उभारला जातो तर कधी एक एखादा संघ कमी धाव संख्येवर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतो. असाच काहीसा प्रकार टी-२० सामन्यात पाहायला मिळाला आहे. तर एका महिला टी-२० सामन्यादरम्यान एक अजबच प्रकार घडलाय आहे, जिथे एका संघाच्या १० फलंदाज भोपळा न फोडतात माघारी परतले. परिणामी या संघाला मोठी धाव संख्या उभारू शकला नाही. त्यामुळे विरोधी संघ फक्त २ चेंडूत सामना जिंकला आहे.
12 Aug 2025 03:40 PM (IST)
राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दि. ८ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणारी १९ वर्षीय युवती राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. पोलिस हवालदार वाघ अधिक तपास करीत आहेत.
12 Aug 2025 03:21 PM (IST)
राज्यात काही भागांत कृत्रिमरीत्या खत टंचाई निर्माण करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा कृषी विभागाने ३१० खत विक्रेत्यांची तपासणी केली. या वेळी पॉस मशिनचा वापर न करता खतांची प्रत्यक्ष विक्री केल्याचे दिसून आल्यामुळे प्रत्यक्ष व पॉस मशिनवरील खतसाठ्यात तफावत आढळून आली. आतापर्यंत कृषी विभागाने ९ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले असून, उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे यांनी दिली.
12 Aug 2025 03:00 PM (IST)
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका टोळक्याने सुलेमान खान (वय 21) या तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या केली आहे. एवढाच नाही तर तर आरोपींनी त्याचा मृतदेह मूळ गावी नेला आणि घरासमोर फेकला. त्यानंतर त्याच्या आईवडिलांसह बहिणीलाही बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
12 Aug 2025 03:00 PM (IST)
पुणे शहरात चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांनी थैमान घातल्याचे दिसत असून, बालाजीनगर परिसरात पादचारी महिलेला टार्गेटकरत तिच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांची सोन साखळी चोरट्यांनी चोरून पोबारा केला. तर, येरवडा भागात एका तरुणाचा मोबाईल मदतीच्या बहाण्याने घेऊन पोबारा केल्याचे समोर आले आहे.
12 Aug 2025 02:45 PM (IST)
जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रेयसीने लग्नासाठी नकार दिल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव गौरव बोरसे असे आहे. हा तरुण जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गंधाली गावातील रहिवासी आहे.
12 Aug 2025 02:30 PM (IST)
पातूर तालुक्यातील गावंडगावात अवैध दारू विक्रीच्या विळख्यात अडकलेल्या एका तरुणाने अखेर जीवनयात्रा संपवली. रुपेश ज्ञानदेव राठोड (वय 21) या तरुणाने गावाच्या शेवटी असलेल्या घराजवळ लिंबाच्या झाडाला साडीच्या दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने केवळ एक कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गावात दारू आणि त्यावरील पोलिसांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे संतापाची लाट उसळली आहे.
12 Aug 2025 02:15 PM (IST)
श्रावणी सोमवारनिमित्त खेड तालुक्यातील कुंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. भाविकांना घेऊन पिकअप वाहन घाटातून जात असतांना खोल दरीत कोसळली. या भीषण अपघात 10 महिलांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.
12 Aug 2025 02:00 PM (IST)
दहीहंडीचा सराव करताना सहाव्या थरावरुन खाली कोसळल्याने मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर येथे बालगोविंदांचा मृत्यू झाला होता. दहिसर पूर्वेला असणाऱ्या केतकीडपाडा परिसरात रविवारी रात्री हा प्रकार घडला होता. यामध्ये नवतरुण गोविंदा पथकाचा बालगोविंदा महेश रमेश जाधव (वय 11) याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
12 Aug 2025 01:45 PM (IST)
गोंदियातून एक धक्कदायक घटना समोर येत आहे. गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस (MBBS)च्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने हाताने लिहिलेली चिठ्ठी मित्रांना व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवली. व्हाट्सअप ग्रुपवरील चिठ्ठी पाहताच मित्रांनी त्याच्या रूममध्ये धाव घेतली, आणि विद्यार्थ्याचे प्राण वाचविले. त्याच्यावर गोंदिया येथील वैधकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
12 Aug 2025 01:30 PM (IST)
पुणे शहरात दररोज वाढणारी वाहन संख्या आणि इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील रस्त्यांची असलेली संख्या लक्षात घेत पुणे पोलिसांनी वाहतूक नियोजन आखले आहे. पुढच्या बारा वर्षात वाहन संख्या १ कोटींच्या घरात पोहचेल. त्यामुळे कोंडी अधिकच गंभीर रूप धारण करणार आहे. त्यानूसार पोलिसांनी नियोजन आखले असले तरी त्याला एकत्रित सहभाग आणि पायभूत सुविधा तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे हा उपाय उत्तर म्हणून असणार आहे. पुणे पोलिसांनी या कोंडीतून पुणेकरांना मुक्तता देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानूसार २०३८ पर्यंतचे प्लॅनिंग आखले आहे.
12 Aug 2025 01:30 PM (IST)
त्रिपुराच्या सिपाहीजला जिल्ह्यातील सोनामुरा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने आपल्या 5 महिन्यांच्या मुलीची हत्या केली, कारण तिला आपल्या प्रियकरासोबत पळून जायचं होतं. पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे. आरोपी महिलेचं नाव सुचित्रा देबवर्मा असल्याचं सांगण्यात येत आहे.
12 Aug 2025 01:15 PM (IST)
काल (सोमवारी) जुगार अड्ड्यावर पुणे पोलिसांनी (Pune Police) छापा टाकत कारवाई केली. यावेळी अड्ड्यावरती जुगार खेळताना एका भाजप (BJP) पदाधिकाऱ्याला पोलिसांनी (Pune Police) रंगेहाथ पकडलं आहे. या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह 2 ते 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औदुंबर कांबळे हा पर्वती विधानसभा मतदारसंघाचा चिटणीस म्हणून कार्यरत आहे.
12 Aug 2025 01:10 PM (IST)
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोंबिंग ऑपरेशनदरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चार कोयते जप्त केले आहे. मात्र, तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्यारे अल्पवयीन आरोपीच्या घरात त्याच्या आईच्या परवानगीने लपवल्याचे समोर आल्यानंतर हडपसर पोलिसांनी या गुन्ह्यात आईलाही सहआरोपी केले आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात विश्वजित उर्फ यश रामचंद्र मोरे (२०, रा. गोंधळेनगर, हडपसर) याला अटक केली आहे. मोरेसह त्याचा अल्पवयीन साथीदार आणि त्या अल्पवयीनची आई यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
12 Aug 2025 12:50 PM (IST)
भाऊ-बहिणीच्या अतूट नात्यचा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनासाठी बहिणीकडे जाऊन परतत असताना झालेल्या दुचाकी अपघातात अंबाजीचीवाडी (ता. पुरंदर) येथील गणेश बाळासो पवार (वय २४) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवार (दि.९) रोजी रात्री साडेनऊ च्या दरम्यान जुनी जेजुरी– कोळविहिरे मार्गावरील परिसरात हा अपघात घडला आहे.
12 Aug 2025 12:30 PM (IST)
कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रस्त्याच्या कडेला दोन मोठ्या काळ्या पिशव्या ठेवल्या होत्या. त्या पिशव्या पाहून गावकऱ्यांना संशय येऊ लागला. त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावले. त्यानंतर पिशव्या उघडून पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. कर्नाटकमधील कोरतगेरे येथील कोलाला गावात एका महिलेची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह तुकड्यांमध्ये सापडला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मृतदेहाचे भाग अनेक प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून रस्त्याच्या कडेला फेकण्यात आले होते. प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले. प्लास्टिकची पिशवी उघडताच पोलिसांनाही धक्का बसला. आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
12 Aug 2025 12:10 PM (IST)
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात कुंडेश्वरच्या दर्शनाला जाणाऱ्या महिलांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. कुंडेश्वरचा डोंगर चढताना भाविकांनी भरलेले एक वाहन (पिकअप) दरीत कोसळले. पिकअप वाहन ५ ते ६ वेळेस दरीत पलटी झाले. या दुर्घटनेत ८ महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक महिला जखमी झाल्या आहेत. खेड तालुक्यातील देवदर्शनासाठी या महिला निघाल्या होत्या. त्यावेळी हा अपघात झाला. ही घटना खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कुंडेश्वर शिव मंदिराकडे जाताना घाट परिसरात घडली आहे. हा अपघात घडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. राज्य शासन या संकटाच्या काळात अपघातग्रस्त नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार दिली आहे.
12 Aug 2025 11:56 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. एका सराईत गुंडाने चक्क मैत्रिणीवरच गोळीबार केला आहे. या गोळीबाराच्या घटनेत गोळी ही तरुणीच्या हाताला लागल्याने तरुणीचे प्राण बचावले आहे. त्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोळीबार करणाऱ्या सराईत गुंडाचे नाव सय्यद फैजल उर्फ तेजा असे आहे. तर जखमी झालेल्या मैत्रिणीचे नाव राखी मुरमरे (२२वर्षीय) असे आहे.
12 Aug 2025 11:55 AM (IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं मला भेटायला आली होती. ते मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, असा दावा पवार यांनी केला होता. यावरुन शरद पवार यांची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी. यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले आहे.
12 Aug 2025 11:54 AM (IST)
पिंपरी-चिंचवड अन् पुणेकर वैष्णवी आत्महत्याप्रकरण विसरलेले नसतानाच पुण्यात एका नवविवाहितेने सासरच्या जाचाला अन् त्यांच्या पैशांच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाह होऊन वर्ष पुर्ण होत असतानाच सासरच्यांकडून कंपनीसाठी २० लाख रुपये आणण्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. त्यामुळे तिने सतत होणाऱ्या छळाला कंटाळून शेवटी गळफास लावून आत्महत्या केली. स्नेहा विशाल झेंडगे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी वडील कैलास मच्छिंद्र सावंत (वय ५५, रा. कर्देहळी, जि. सोलापूर) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, ननंद तेजश्री थिटे आणि इतर दोघे अशांवर गुन्हा नोंदविला आहे.
12 Aug 2025 11:33 AM (IST)
पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. कात्रज घाटात रंगकाम करणाऱ्या ठेकेदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ठेकेदाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे. चंदर पिराजी माेहिते (वय ५६, रा. विनय सागर आर्केड, त्रिमूर्ती चौकाजवळ) असे आत्महत्या केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याबाबत मोहिते यांची पत्नी शकुंतला (वय ५६) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बांधकाम व्यावसायिक संतोष चोरगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.