आता ज्येष्ठ नागरिकांची सायबर फसवणूक होणार नाही, काय आहे महाराष्ट्र सरकारचा प्लॅन? (फोटो सौजन्य - X)
मुंबई : ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या सायबर फसवणुकीविरोधात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र सायबर आणि जेनएसलाईफ यांनी संयुक्तपणे सात भागांच्या विशेष माहितीमालिकेची निर्मिती केली आहे. ही मालिका जेनएस लाईफ अॅप आणि अधिकृत यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. या मालिकेत महाराष्ट्र सायबरचे पोलीस महा उपनिरिक्षक संजय शिंत्रे यांच्यासोबत प्रसिद्ध क्राईम लेखक व दिग्दर्शक अनिर्बन भट्टाचार्य यांनी संवाद साधला आहे. ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्ह्यांना कसे बळी पडतात, याबाबत शिंत्रे यांनी सविस्तर माहिती दिली असून ‘डिजिटल अरेस्ट’ यांसारख्या फसवणुकीविषयी माहितीही देण्यात आली आहे.
ज्येष्ठांना सायबर धोक्यांचा वेळोवेळी सामना करावा लागतो, त्यावर उपाययोजना करताना जेनएस लाईफने खास आपल्या गोल्ड प्लानच्या सदस्यांसाठी सायबर इन्शुरन्स लॉन्च केला असून यात फसवणुकीमुळे होणारे नुकसान कव्हर करतो तसेच सोपी सुरक्षा मार्गदर्शिका, संवादात्मक जागरूकता सत्रे आणि २४ तास सेवा देण्यात आली आहे.
देशात दररोज सरासरी ५,००० सायबर गुन्हे नोंदले जात असून, त्यातील बरेच बळी हे वरिष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, संशयास्पद कॉल, मेसेजपासून दूर राहावे आणि कोणत्याही शासकीय तपासासाठी व्हिडिओ कॉल येत नाही, हे लक्षात ठेवावे, असे आवाहन शिंत्रे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी यूट्यूब वरील @GenSLifeOfficial या चॅनलला भेट द्या, असे आवाहनही शिंत्रे यांनी केले आहे.
– देशभरात १२ लाखांपेक्षा जास्त सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये ११,३३३ कोटी रु. च्या नुकसानाची नोंद आहे.
-२०२४ मध्ये, फक्त महाराष्ट्रात ८,९४७ सायबर प्रकरणे नोंदण्यात आली आहेत. यावरून डिजिटल फसवणुकीच्या प्रकरणांचे वाढते प्रमाण दिसून येते.
-पुण्यात सर्वाधिक आर्थिक नुकसान रु. ६,७०७ कोटी रु. झाल्याची नोंद आहे.
-नागपुरात ६३.८५ कोटी रु. च्या फसवणुकीची २१२ प्रकरणे आहेत.
-मुंबईत सर्वाधिक ४८४९ प्रकरणे नोंदण्यात आली आहेत.