संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील मांजरी परिसरात हातउसने दिलेल्या पैशांवरून वादविवाद होऊन सहा ते सात जणांच्या टोळक्याने चार अल्पवयीन मुलांवर धारधार हत्याराने सपासप वार करून खूनाचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. टोळक्याच्या हल्यात चार अल्पवयीन मुले गंभीररित्या जखमी झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी अक्षय अशोक बदर आणि प्रसाद खंदू ढोबळे (रा. मांजरी) यांना अटक केली आहे. तर, त्यांच्यासोबतच्या चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात १६ वर्षीय मुलाने तक्रार दिली आहे. यात १७ वर्षांचे तीन व तक्रारदार मुलगा जखमी झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, यातील तक्रारदार मुल शाळा शिकत नाहीत. मिळेल ते कामे करतात. दरम्यान, तक्रारदार मुलाचे आरोपी मुलामधील एकाकडे हात उसने दिलेले पैसे होते. ते पैसे मागण्यासाठी तो इतर तीन मित्रांसोबत गेला होता. त्याने तिथे उभे असलेल्या दोघांना संबंधित मुलाबाबत विचारणा केली. त्यांना पैसे मागण्यासाठी आलो असल्याची माहिती दिली. तेव्हा या मुलांनी इतरांना बोलवून घेतले. सहा ते सात जणांचे टोळके हातात धारधार हत्यारे घेऊन आले. तसेच, त्यांनी चारही अल्पवयीन मुलांवर वार करण्यास सुरूवात केली. मुले आरोपींच्या तावडीतून पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. तसेच त्यांच्यावर सपासप वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या घटनेनंतर सहा जणांना पकडले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सोनटक्के करत आहेत.