माजी सरपंच महिनाभर गायब, पोलीस स्टेशनजवळच सापडला मृतदेह; संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती (फोटो सौजन्य-X)
बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अतिशय गंभीर घटना समोर आली आहे. वंजारी समाजाचे माजी सरपंच अशोक सोनुने यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण आहे आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक सोनुने यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की त्यांचे पोलीस ठाण्यातून अपहरण करण्यात आले आहे. संपत्तीच्या वादातून त्यांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, वाद मिटवण्यासाठी पोलीस ठाण्यातून फोन आल्यानंतर सोनुने घराबाहेर पडले, पण ते पुन्हा कधी परतलेच नाहीत.
महिनाभराच्या तपासानंतर लोणार पोलीस स्टेशनपासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर अशोक सोनुने यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला. या मृतदेहाला हात, पाय आणि मुंडके नसल्याने या हत्येचे क्रौर्य अधोरेखित होते. ही हत्या अत्यंत अमानुष पद्धतीने केल्याचे स्पष्ट होत आहे.
या प्रकरणात सोनुने यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात पोलिसांचाही सहभाद असल्याचा गंभीर आरोप केला. ‘माझ्या जीवाला धोका आहे’, अशी तक्रार सोनुने यांनी गेल्या एका वर्षात आठ वेळा पोलीस ठाण्यात दिली होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तसेच, सोनुने बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तीन वेळा पोलीस स्टेशनला धाव घेतली होती. असे असतानाही पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही, असा आरोप केला जात आहे.
या घटनेल महिना उलटूनही या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. या किरकोळ जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये वंजारी समाजातून आणि सोनुने यांच्या कुटुंबीयांकडून गरीब वंजारा समाजाचा वाली कुणीच नाही का? विधानभवनात कोण बोलणार? असे प्रश्न विचारले जात आहे.
दरम्यान, संपूर्ण घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, बुलढाणा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची तात्काळ आणि गांभीर्याने चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेऊन यात विशेष तपास पथक किंवा गुन्हे अन्वेषण विभाग मार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा जाहीर निषेध केला असून गरीब वंजारी समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा देखील देण्यात आला आहे.