संग्रहित फोटो
पुणे/ अक्षय फाटक : पुणे शहराचे स्वास्थ राखण्यासाठी पुणे शहर पोलिस दल रात्रंदिवस पहारा देत असताना, काही अधिकारी अन् अंमलदारांमुळे पोलिस खाते डागाळले जात आहेच, पण पोलिस दलाची लक्तरे देखील वेशीला टांगली जात आहेत. अशा या अधिकारी अन् पोलिस अंमलदारांवर निलंबन आणि बडतर्फीची कारवाई होते, पण मलिन झालेली प्रतिमा पुन्हा उंचावण्यासाठी वर्षेनवर्षे पोलिस दलाला खस्ता खाव्या लागतात. पुणे शहर पोलिस दल देखील अशाच काही महाभागांमुळे गेल्या काही वर्षात डागाळले गेले असून, गेल्या सात वर्षात तब्बल ३३३ जणांवर निलंबनाची कारवाई, तर ६१ जणांवर बडतर्फीची कारवाई झाल्याचे समोर आले आहे.
शहरातील गुन्हेगारीचा आलेख वर्षागणीक वाढतच आहे. मारामारीपासून खूनापर्यंत अन् लुटमारीपासून खंडणीपर्यंत, तसेच जुगार ते अंमली पदार्थांचे काळे धंदे सातत्याने समोर येत आहेत. हे रोखण्यासाठी एकीकडे पोलिस दल मेहनत करत असताना मात्र, अशा गोष्टींना पाठबळ किंवा त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम काहींकडून होत असल्याचे समोर येत आहे. अडवणूक करून किंवा धमकावून पैसा उकळला जात असल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत.
एकाच महिन्यात गंभीर प्रकरणे उघडकीस
गेल्या एकाच महिन्यातील प्रकरणांवर नजर टाकली तर, शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील महिला अंमलदार, एक अधिकारी व अंमलदाराने ब्लॅकमेलिंग करून एका प्राचार्याकडूनच ७ लाखांची खंडणी उकळली, तर अर्ज प्रकरणात तब्बल २८ लाख रुपयांची लाच घेताना महिला अधिकारी व दोघांना एसीबीने अटक केली. नंतर एका अंमलदारानेही वॉरंट न बजावण्यासाठी व अटक न करण्यासाठी एका कंपनीच्या मालकांकडून ५ लाख घेतले. पुन्हा आणखी दीड लाख मागणी केली. या प्रकरणांनी पुणे पोलिस दलाच्या प्रतिमेची लक्तरं निघाली.
वरिष्ठांच्या प्रयत्नांना लाचखोरांकडून फाटा
पोलिस दलात शिस्त, पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कठोर भूमिका घेतली जात असली, तरी काही कर्मचाऱ्यांचे वर्तन संपूर्ण दलासाठी लाजिरवाणे ठरत आहे. जनतेमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी केवळ गुन्हे उघडकीस आणणे पुरेसे नसून दलातील ‘काळ्या मेंढ्यां’वर वेळेत कारवाई होणेही तितकेच आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी
शहर पोलिस दलातील आकडेवारीनुसार २०२० ते एप्रिल २०२६ या कालावधीत ६० अधिकारी व २७३ अंमलदारांवर निलंबनाची कारवाई झाली. विशेष म्हणजे, २०२३ आणि २०२४ या दोन वर्षांत सर्वाधिक कारवाया झाल्या. २०२३ मध्ये ६६, तर २०२४ मध्ये ६५ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. इतकेच नव्हे, तर शासकीय सेवेतून बडतर्फ किंवा सक्तीने सेवाबाहेर केलेल्यांची संख्याही चिंताजनक आहे. गेल्या ७ वर्षात ६१ जणांना बडतर्फ केले आहे.
पुणे पोलिस दलातील वर्षनिहाय निलंबन आकडेवारी
| वर्ष | अधिकारी | अंमलदार |
|---|---|---|
| २०२० | २ | २७ |
| २०२१ | ५ | ३२ |
| २०२२ | ७ | ४६ |
| २०२३ | १८ | ४८ |
| २०२४ | १७ | ४८ |
| २०२५ | ८ | ५२ |
| २०२६ (एप्रिलपर्यंत) | ३ | २० |
| एकूण | अधिकारी (६०) | ३३३ |
बडतर्फीची कारवाई
| वर्ष | संख्या |
|---|---|
| २०२० | ३० |
| २०२१ | २ |
| २०२२ | ५ |
| २०२३ | ३ |
| २०२४ | १४ |
| २०२५ | ४ |
| २०२६ (एप्रिलपर्यंत) | ३ |
कोणत्या कारणांमुळे कारवाई?






