पैशासाठी विवाहितेचा केला छळ
धाराशिव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय वाढताना दिसत आहे. असे असताना आता सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या एका विवाहितेला टेंडर घेण्यासाठी माहेरहून पैसे आण असा तगादा लावत तिचा छळ करण्यात आला. तिला मारहाण करुन हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आली.
गंगा रेसिडेन्सी येथे हा प्रकार घडला. पती करुणासागर धर्मराज मोरे, दिर राहुल मोरे आणि सासू (सर्व रा. मॉर्डन सोसायटी, जूना मालेगाव रोड, चाळीसगाव जि. जळगाव) अशी पीडितेचा छळ करणाऱ्यांची नावे आहे. त्यांच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितेचा विवाह १३ मे २०१८ रोजी करूणासागर धर्मराज मोरे याच्याशी झाला. पती कॉन्ट्रॅक्टर असल्याने टेंडर भरण्यासाठी पैशांची गरज भासत होती. त्यामुळे तुझ्या वडिलांकडून पैसे आण असा दबाव टाकत तो पीडितेला सतत त्रास देत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
हेदेखील वाचा : Nashik News : सासरकडून मानसिक आणि शारीरिक छळ; जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
दरम्यान, पैसे न दिल्यास पीडितेला मारहाण करत होता. कामाबाबत साधी विचारणा केली तरी शिवीगाळ, अपमान करत होता. पीडितेच्या सासू व दीर राहुल मोरे यांनीही घरगुती किरकोळ कारणांवरून तिला शिवीगाळ करून अपमानित केल्याचे नमूद आहे.
१० ऑगस्ट २०२५ रोजी हडपसर येथील घरी दुपारी पतीने कुठलेही कारण नसताना पीडिता व तिच्या मुलीला मारहाण करुन ‘तू जर व्यवस्थित राहिली नाहीस तर हातपाय तोडून टाकीन’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजीनगरमध्येही विवाहितेचा छळ
काही दिवसांपूर्वीच, छत्रपती संभाजीनगर येथे विवाहितेचा छळ करण्यात आल्याचे समोर आले. ‘नांदायचे असेल तर माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये’, असा तगादा लावत विवाहितेला मारहाण करुन तिला घरातून हाकलून लावले. ही घटना १९ एप्रिल २०२४ ते २८ जून २०२४ दरम्यान जोगेश्वरी (ता. गंगापूर) येथे घडली.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; सोन्याचे दागिने काढून घराबाहेरही हाकलले






