सौजन्य - नवराष्ट्र टीम
शिरोली : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरोली औद्योगिक वसाहतीतील एचएमटी फाटा येथे मेनन पिस्टन कंपनीसमोर आराम बस ( ट्रॅव्हल्स) कंटेनर व इको गाडीचा भीषण अपघात शनिवारी सकाळी ७.३० च्या सुमारास झाला आहे. या अपघातात एकाचा जागीचं मृत्यू झाला आहे. २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ३ ते ४ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, श्री रोडवेज कंपनीचा कंटेनर माल घेऊन चालक शैलेश यादव( रा.उत्तरप्रदेश) मुंबईहून बंगळूरुकडे जात होता. शनिवारी सकाळी ७.३० च्या सुमारास कंटेनर शिरोली औद्योगिक वसाहतीतील एचएमटी फाट्याजवळ आला असता कंटेनरमध्ये अचानक बिघाड झाल्याने गाडीचा वेग कमी करून बाजूला घेत होता. दरम्यान या कंटेनरच्या पाठोपाठ पुण्याहून बेळगांवकडे नाकोडा कंपनीची ट्रॅव्हल्स प्रवाशी घेऊन चालक संदीप शंकरराव चांगभले (रा.निपाणी) हा निघाला होता. समोरच्या कंटेनरचा अंदाज न आल्याने कंटेनरला ट्रॅव्हल्स बसची जोराची धडक बसली. धडक इतकी जोरात होती की, कंटेनरचा सुमारे ७ फूट भाग ट्रॅव्हल्स बसमध्ये क्लिनर कडील बाजूस घुसला.
यामध्ये क्लिनर रोहन कुलकर्णी (रा. खडकलाट, निपाणी) हा जागीच ठार झाला आहे. तसेच चालक ट्रॅव्हल्समधून उडून रस्त्यावर १० फुट अंतरावर पडला होता. तसेच या ट्रॅव्हल्सच्या पाठोपाठ कराडमधून आजारी रुग्ण घेऊन येणाऱ्या इको गाडीने ट्रॅव्हल्स बसला जोराची धडक दिली. सुदैवाने या इको गाडीतील एअरबॅग्ज उघडल्याने यातील प्रवासी वाचले.
या तिहेरी भीषण अपघातानंतर ट्रॅव्हल्स बसमधील साखर झोपेतून जागे झालेले प्रवासी जिवाच्या आकांताने जोरदार आरडाओरडा करु लागले. या अपघातात वीसहून अधिक जखमी झाले आहेत. यातील तिघा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. हे सर्व जखमी बेळगाव व चंदगड भागातील आहेत.
घटनेची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिस, स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना संकटकाळी बाहेर पडण्याच्या मार्गातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी ५ ते ६ रुग्णवाहिका बोलावून किरकोळ जखमींना शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तर गंभीर जखमींना कोल्हापूरातील सीपीआर तसेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळावरचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते.
तर ट्रॅव्हल्समधून जखमी प्रवाशांना बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली. या घटनेनंतर ट्रॅव्हल्समधील वयस्कर नागरिक, युवती भयभीत झाल्या होत्या. अपघातानंतर सुमारे एक तासभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. जखमींची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.