अग्निवीर जवानाकडून रायफल आणि जिवंत काडतूसं चोरी केल्याप्रकरणी मुंबईतून दोन संशयितांना अटक (फोटो सौजन्य-X)
Mumbai High Alert News In Marathi : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगर येथे ड्युटीवर असलेल्या अग्निवीर सैनिकाकडून एका अज्ञात व्यक्तीने एक इन्सास रायफल आणि ४० जिवंत काडतुसे असलेली दोन मॅगझिन चोरली. रायफल आणि गोळ्या चोरणारा व्यक्ती नेव्ही ऑफिसर असल्याचे भासवून आला होता. नेव्ही नगर हे भारतीय नौदलाचे सुरक्षित छावणी आहे. भारतीय नौदलाच्या म्हणण्यानुसार, कफ परेड पोलिसांनी या प्रकरणात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. एनआयए आणि एटीएसने त्याची चौकशी सुरू केली आहे. भारतीय नौदलाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रायफल शोधण्यासाठी पोलिसांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली जात आहे. तसेच, घटनेची चौकशी करण्यासाठी एक बोर्ड स्थापन करण्यात आला आहे. याचप्रकरणी आता दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता नौदलाच्या गणवेशात अज्ञात व्यक्ती नेव्ही गार्डशी संपर्क साधला. त्याने सेन्ट्री जवानाला सांगितले की तो पुढच्या शिफ्टसाठी त्याची जागा घेण्यासाठी आला आहे. गार्डने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याने ड्युटी दरम्यान त्याच्याकडे असलेली त्याची सर्व्हिस रायफल आणि मॅगझिन त्याच्याकडे सोपवली आणि तो त्याच्या हॉस्टेलला निघून गेला. एक तासानंतर, नुकतीच त्याची शिफ्ट संपवलेल्या गार्डला अचानक आठवले की तो वॉच टॉवरवर त्याचे घड्याळ विसरला आहे. तो परत आला तेव्हा त्याला दिसले की त्याची जागा घेण्यासाठी आलेला माणूस तिथे नव्हता. त्याने त्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला. तीन तासांनंतरही तो सापडला नाही तेव्हा त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. या प्रकरणात आता पोलिसांनी दोन जणांना अटक करण्यात आली आहेत. युनिफॉर्म बदलल्यानंतर ही अज्ञात व्यक्तीने रायफल आणि काडतूस एका पांढऱ्या रंगाच्या बॅगमध्ये पॅक केली आणि बाहेर वाट पाहात असलेल्या दुसऱ्या व्यक्तीकडे फेकली.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. त्याला ड्युटीच्या वेळेची आधीच माहिती होती की त्याने सुरक्षेतील त्रुटींचा फायदा घेतला हे अधिकारी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा स्केच तयार करण्यात आले. या प्रकरणानंतर सुरक्षा वाढवण्यात आली.मुंबईतून दोन संशयित व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. अग्नीवीर देखील या कटात सामील आहे का? याची देखीस चौकशी सुरु केली आहे. हा व्यक्ती भारतातील आहेच का, काय होता हेतू या सगळ्याची चौकशी पोलीस करत आहेत.