नवी मुंबई /सावन वैश्य : शहरात बनावट सोशल मीडिया पत्रकारांचा दहशतवादी कारभार वाढू लागला असून इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्युबवर खोट्या नावाने पत्रकारिता करण्याच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले आहेत. काही व्यक्ती प्रतिष्ठित न्यूज चॅनलच्या नावासारखी पेजेस व चॅनेल्स तयार करून स्वतःला पत्रकार म्हणवून घेत आहेत आणि बार, लेडीज बार तसेच नाईट क्लबमध्ये जाऊन व्हिडिओ शूट करून पैसे उकळत आहेत.हे बोगस पत्रकार पोलीस ओळखीचा धाक दाखवून बार मालक व ग्राहकांकडून पैशांची उघड मागणी करतात. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याच्या, किंवा चॅनेलवर टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारितेच्या नावाला या तोतया पत्रकारांनी तडा दिला आहे. प्रतिष्ठित मीडिया चॅनलची नावे पुढे एखादा शब्द जोडून नवीन अकाउंटस तयार केली जातात आणि या ‘विश्वसनीय’ वाटणाऱ्या नावांच्या आडून फसवणूक केली जाते. तथाकथित हे मोबाइल पत्रकार इतरांकडून व्हायरल झालेले व्हिडिओ डाउनलोड करून त्यावर स्वतःचा चॅनल लोगो लावतात व स्टिंग ऑपरेशनच्या नावाने पैसे मागतात. पैसे न मिळाल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही दिली जाते. रात्रीच्या वेळी असे प्रकार अधिक होत असल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
काही प्रकरणांमध्ये तर हे बनावट पत्रकार पोलीसांची वर्दी घालूनही ठिकाणी पोहोचतात, तपासणीच्या नावाखाली उपस्थित ग्राहकांना घाबरवतात आणि त्यामुळे बारमालकांना सामाजिक तसेच आर्थिक नुकसान सहन करावे लागते. ग्राहकांचा व्हिडिओ पसरवण्याच्या धमक्या देऊन मानसिक छळ केल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.दरम्यान, या प्रकरणांमुळे पोलिसांच्याही प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सायबर सेलमार्फत बनावट सोशल मीडिया आयडी शोधून कठोर कारवाईची मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे.
नियमांचा भंग करणाऱ्या काही बारांवर कारवाई होणे आवश्यक असले तरी, पत्रकार नावाचा वापर करून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळ्यांवर तातडीने अंकुश लावण्याची मागणी नागरिक व व्यावसायिकांकडून होत आहे. नवी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची दखल घेऊन पुढील कारवाई कधी होते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.






