नाशिक: नाशिकमधून सतत गुन्हेगारीच्या बातम्या समोर येत आहे. ही वाढती गुन्हेगारी एक चर्चेचा विषय ठरली आहे. आता धारधार शास्त्राने घरांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. यात गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा गोळीबार नेमका कोणी केला आणि का केला याचा तपास पोलीस करत आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून पोलिसांनी एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हातात धारदार शस्त्र घेऊन पळत असतांना पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं. विकी गुंजाळ असं अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. ही घटना नाशिकच्या शरणपूर रोड परिसरात रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आवाहन आता पोलिसांपुढे असणार आहे.
मालेगावमध्ये लहान मुलांच्या भांडणातून दोन गटांत गोळीबार आणि हाणामारी, मुख्य आरोपी अटकेत; परिसरात दहशत
नाशिकच्या मालेगाव शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. लहान मुलांच्या भांडणातून दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या राड्यात गोळीबार आणि हाणामारी देखील करण्यात आली. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, लहान मुलांमध्ये किरकोळ भांडण झाला होता. याचा राग संशयित मेहताब अली याने मनात धरला आणि सुमारे 10 ते 12 जणांना सोबत घेत फिर्यादी लईक अहमद मोहम्मद कामील यांच्या घरासमोर हल्ला चढवला. संशयित मेहताब अलीने दोन्ही हातात पिस्तूल घेत फिर्यादीच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या, मात्र सुदैवाने फिर्यादी खाली बसल्याने तो थोडक्यात बचावला. गोळीबारानंतर आरोपी व त्याच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नाही तर फिर्यादीच्या घरात घुसून तोडफोड केली.
या हल्ल्या दरम्यान काही जणांच्या हातात दोन तलवारी असल्याचे साक्षीदारांनी सांगितले. हाणामारी दरम्यान घराबाहेर उभी असलेली मोटारसायकल आणि चारचाकींचे नुकसान करण्यात आले. या गोंधळात फिर्यादीचा मोबाईल फोन व तब्बल 50,000 रुपये रोख रक्कम गायब झाल्याचेही समोर आले आहे. त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला.






