२ तस्कर जेरबंद, १०४ किलो गांजा जप्त; ओडिशाच्या गांजातस्करीचा पर्दाफाश
अमरावती : ओडिशा राज्यातून अमरावती जिल्ह्यात गांजाची तस्करी करणाऱ्या २ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पथकाने अटक केली. रवी रामराव राठोड (३६, रा. भिवापूर कुऱ्हा, ता. तिवसा) व आकाश गौतम भडके (३२, रा. वाई बोध, ता. नांदगाव खंडेश्वर) अशी आरोपींची नावे आहेत. या कारवाईत तब्बल १०४ किलो ८७९ ग्रॅम गांजा किंमत २० लाख ६६ हजार ९६०, तसेच ५.५० लाखांचे वाहन असा एकूण २६ लाख १६ हजार ९६० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुरुवारी (दि. ३०) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबूरकर पथकासह तिवसा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली. काही इसम नागपूरहून अमरावतीकडे अवैध गांजाची वाहतूक करीत आहेत. त्यानुसार, पोलिसांनी नागपूर-अमरावती हायवेवरील मोझरी दासटेकडी-डवरगाव उड्डाण पुलाखाली नाकाबंदी केली. दरम्यान, एक विनाक्रमांकांचे वाहन थांबविले असता त्यातील दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय आला. पोलिसांनी तपास केल्यावर वाहनात एमएच-१७/एजे-२२८३ आणि २ सीजी-१०/एबी-२८४९ अशा नंबरप्लेट आढळल्या.
सखोल चौकशीत आरोपींनी वाहनात गांजा लपविल्याचे कबूल केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अमरावती जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना मोठा धक्का बसला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर, सागर हटवार, अमोल देशमुख, बळवंत दाभणे, भूषण पेठे, सुधीर बावणे, मंगेश लकडे, सचिन मसांगे, पंकज फाटे, दिनेश कनोजिया, अरविंद गांवडे, महेश काळे, सायबरचे सागर धापड, विकास अंजीकर, शिवा शिरसाठ, तसेच चालक पोलीस हवालदार कैलास भागडकर, संजय प्रधान, नीलेश आवंडकर यांनी सहभाग घेतला.
वाहनाच्या मागील बाजूच्या दोन्ही टेललाइटच्या आत, चालक व वाहकाच्या दरवाज्यांच्या खाली आणि वाहनाच्या चेंबरमध्ये तयार केलेल्या गुप्त कप्प्यांमध्ये एकूण ५३ खाकी टेपमध्ये गुंडाळलेले गांजाचे पुडे सापडले. या दोन्ही आरोपींवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये तिवसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. जप्त मुद्देमाल व आरोपींना तिवसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.






