ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : दिवसेंदिवस शहरात अंमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. काही दिवसांपूर्वीच गांजा, मेफेड्रोन, कोकेन, चरसनंतर आता पुन्हा एकदा अंमली पदार्थांची विक्री करण्याविरोधात पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. ठाण्यात हायब्रीड गांजाची तस्करी सुरु असल्याचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केला आहे.
या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतलं असून सुमित कुमावत (21) असे या तस्कराचे नाव असून तो मूळचा राजस्थानच्या जैसलमेरमधील रहिवासी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दोन कोटी 37 लाख 40 हजार रुपये किमतीचा दोन किलो 374 ग्राम विड्स म्हणजेच हायब्रीड गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे सिंडिकेट चालवणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
मुंब्रा येथील जुन्या टोलनाक्याजवळील सिम्बॉयोसिस शाळेजवळ एकजण अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथकाचे अमोल देसाई यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल म्हस्के यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून सुमित कुमावतला ताब्यात घेतले.
या आरोपीची पोलीसांनी झडती घेतली असता पोलिसांना दोन किलो 374 ग्राम हायब्रीड गांजा आणि एमडीएमए (मिथिलेन डीऑक्सी मेथां फेटामाईन) 19 टॅब्लेट्स सापडल्या. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याचे मुंबई व राज्यातील विविध ठिकाणांवरील ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात असल्याचा समोर आले आहे. तसेच तो आंतरराष्ट्रीय तस्करी टोळीतील सक्रिय सदस्य असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. त्याने हा एवढ्या मोठ्या प्रमाणात हायब्रीड गांजा कुठून व कोणाला विक्री करण्यासाठी आणला होता याचा तपास सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखा, उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.