File Photo : Suicide News
चंद्रपूर : शहरातील बाबूपेठ व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाने आत्महत्या केली. शौचालयात लुंगीच्या सहाय्याने त्याने गळफास घेऊन जीवन संपवलं. ही घटना सोमवारी (दि. 24) दुपारच्या सुमारास घडली.
सचिन जनार्धन शिगरपवार (वय 42) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सध्या तो नेरी गावचा रहिवासी आहे. सचिन नोकरीच्या शोधात कुटुंबासह नेरी येथे राहत होता. दरम्यान, त्याला दारूचे व्यसन लागले. दारू सोडण्यासाठी कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी त्याला चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील झेप व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. मात्र, तो मानसिक तणावाखाली जगत होता.
सचिन शिगरपवार हा सातत्याने तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातूनच त्याने शौचालयात लुंगीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, प्राथमिक तपास केला जात आहे.
आत्महत्येच्या प्रकारांमध्ये होतीये वाढ
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न आणि आत्महत्या यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात आता चंद्रपूर शहरातील बाबूपेठ व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाने आत्महत्या करून जीवन संपवले.