सौजन्य - नवराष्ट्र टीम
सासवड/संभाजी महामुनी : पुरंदर तालुक्यातील सोनोरीजवळ एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याच्या मद्यधुंद अवस्थेतील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, अपघात घडल्यानंतर संबंधित पोलिस हवालदार योगेश गरुड याने घटनास्थळावरून पळ काढत गाडीही तातडीने दुरुस्त करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
सासवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार योगेश गरुड यांनी शासकीय गणवेशात असताना सोनोरी येथील एका हॉटेलबाहेर सहकारी होमगार्डसोबत दारू प्राशन केल्याची माहिती आहे. त्यानंतर चारचाकी चालवून नशेत असतानाच दुचाकीस्वार संजय रामचंद्र मोरे (वय ५५) यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या मोरे यांना पुढे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर बुधवारी त्यांचे निधन झाले.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?
घटनेनंतर योगेश गरुड याच्यावर कोणतेही कठोर कलम न लावता उथळ स्वरूपाची कारवाई केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्याच्या मेडिकल तपासणीची कोणतीही नोंद नाही, तसेच अपघातग्रस्त गाडी देखील तातडीने वडकी येथील शोरूममध्ये दुरुस्तीसाठी पाठवली गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून पुरावे पद्धतशीर नष्ट करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय
पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या अशा गंभीर प्रकरणातील भूमिकेबाबत नागरिकांत नाराजी आहे. दरम्यान, संजय मोरे यांचा मुलाने सासवड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेवटी प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे योगेश गरुड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सौम्य कलमे लावल्याने लगेचच जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कारवाई होणार का?
याप्रकरणी नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, योगेश गरुडवर कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून गाडी जप्त केली जावी, तसेच त्याचे मेडिकल व ड्रंक अॅन्ड ड्राइव्हचा पुरावा घेतला गेला का याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.