संग्रहित फोटो
पुणे : मदतीचा बहाणा करून एका अनोळखी व्यक्तीने एटीएममध्ये वृद्धाची फसवणूक करत त्यांचे एटीएम कार्ड बदलले आणि त्यांच्या खात्यातून २५ हजार ५५० रुपये काढून घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ७८ वर्षीय ज्येष्ठाने कोंढवा पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १९ एप्रिलला कोंढवा खुर्द येथील कोणार्क पुरम सोसायटीजवळील बँक ऑफ बडोदा एटीएम सेंटरमध्ये घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे त्यांच्या पत्नीसह एटीएममध्ये पैसे काढण्यास गेले होते. तेव्हा एटीएम मशीनमध्ये त्यांचे कार्ड अडकले. त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या अनोळखी व्यक्तीने पुढे येत “मदत करतो” असे सांगून तक्रारदाराची दिशाभूल केली. कार्ड मशीनमधून काढून ते स्वतःजवळ ठेवले आणि त्याच्या जवळ असलेले अन्य एक कार्ड तक्रारदाराला दिले. त्यावेळी गोंधळात वृद्ध दाम्पत्याला ही अदलाबदल लक्षात आली नाही. नंतर त्या अज्ञाताने त्यांच्या एटीएमचा वापर करून ५ हजार रुपये काढले. त्यानंतर केदारी पेट्रोल पंपावर कार्ड स्वाईप करून १० हजार ३०० रुपये आणि १० हजार २५० रुपये अशा दोन व्यवहारांद्वारे एकूण २५ हजार ५५० रुपये त्यांच्या खात्यातून काढले. तक्रारदाराला काही दिवसांनी बँकेकडून व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर फसवणुकीचा उलगडा झाला. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, एटीएम लॉग्ज, तसेच पेट्रोल पंपावरील व्यवहारांचा तपशील तपासला जात आहे.
फलटणमध्येही फसवणूक
गेल्या काही दिवसाखाली ‘काका तुमच्या एटीएमवरून पैसे निघत नाहीत, हे धरा तुमचे कार्ड’, असे म्हणून एटीएम कार्डची अदलाबदल करून अज्ञाताने सुमारे पावणेदोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फलटण येथे ही घटना घडली आहे. याबाबत पोपट दत्तोबा साळुंखे (रा. राजुरी, ता. फलटण) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.