पुणे : पुणे शहरात बाराच्या ठोक्याला वाढदिवस अन् विविध कारणांनी होणाऱ्या फटक्यांच्या आताषबाजीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या घटना शहरातील उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसत असताना त्याला आवर मात्र घातला जात नसल्याचे चित्र आहे. ‘फटफट-ठो’चा आवाज काढणाऱ्या बुलेटस्वारांवर जोरदार कारवाई केल्यानंतर हे आवाज बंद झाल्याचे दिसत असतानाच याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. वाघोलीत मध्यरात्री फटाके फोडताना झालेल्या वादातून दोघांना बेदम मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे मोठी घटना टाळण्यासाठी तरी याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे, अशा पुणेकरांकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात सर्वत्र मध्यरात्री फटाके फोडण्याचे प्रकार घडत आहेत. विशेष करून वाढदिवस साजरा करताना फटाके फोडले जातात. केक कापून सेलिब्रेशन सुरू असताना इकडे रस्त्यावर फटाक्यांची आताषबाजी सुरू असते. पण, याचा त्रास मात्र परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी काही महिन्यांपूर्वी अशा प्रकारांना अटकाव करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, याकडे पोलिसांचा कानाडोळा होत असल्याचे दिसत आहे.
नियमांप्रमाणे रात्री दहा वाजेनंतर ध्वनीप्रदूषण निर्माण करणारे कोणतेही वर्तन बेकायदेशीर आहे. मात्र प्रत्यक्षात फटाके वाजवणारे खुलेआम बिनधास्तपणे ही मर्यादा पार करतात. अशा परिस्थितीत नागरिकांनी न घाबरता तक्रार करण्याची गरज आहे. तसेच, रात्रगस्तीवरील पोलिसांनी स्वतःहून अशा प्रकारांवर तत्काळ कारवाई करत फटाके व ध्वनीप्रदूषणाला लगाम घालणे आवश्यक आहे.
वाघोलीत घटना, परस्परविरोधीत गुन्हे नोंद
वाघोलीतील कावडे वस्ती परिसरात वाढदिवस साजरा करताना झालेल्या गोंधळाचे पर्यवसान दोन गटांमध्ये तुंबळ मारामारीत झाले. यामध्ये महिलांसह अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी वाघोली पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही घटना २२ जूनला मध्यरात्री घडली.
३७ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी मध्यरात्री वाढदिवसानिमित्त फटाके उडवत होते. त्याठिकाणी तक्रारदारांची सीएनजी रिक्षा होती. फटाक्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो असे सांगत त्यांनी रिक्षा जवळ फटाके उडवू नका असे सांगितले. तसेच, मोबाइलमध्ये त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यावरून आरोपींनी तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांना दगड, काठ्या वापरून मारहाण केली, तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, दुसऱ्या गटाने दिलेल्या तक्रारीनुसार ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फटाके फोडताना महिला व अन्य पाच जण मोबाइलमध्ये व्हिडिओ काढत होते. त्याबाबत विचारणा केली असता संबंधितांनी मारहाण केली, असे तक्रारीत नमूद आहे.