'नाहीतर मी वरळी पोलिस ठाण्यासमोर फाशी घेणार...'; गौरी गर्जेच्या आईचा थेट इशारा
या पार्श्वभूमीवर गौरी यांच्या आईनेही त्यांच्या मुलीले झालेल्या त्रासाबद्दल आणि घडलेल्या घटनेबद्दल त्यांच्या वेदना व्यक्त केल्या. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौरीच्या मृत्यूवर संशय व्यक्त करत, आम्ही येईपर्यंत आमच्या मुलीला आम्ही येईपर्यंत तशीच ठेवायला हवे होते, असं म्हणत गौरी यांच्या आईने संतापही व्यक्त केला आहे. गौरी यांच्या आई म्हणाल्या, “गौरीने खरंच आत्महत्या केली असेल, तर अनंतने तिचा मृतदेह तसाच ठेवायला हवा होता. त्याने मुलीला हात कसा लावला? तो डॉक्टर होता का?” असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, “माझ्या मुलीने आत्महत्या केली होती तर आम्ही पोहोचेपर्यंत तिला तसेच ठेवायला हवे होते.” असंही त्यांनी सांगितलं. त्याचवेळी ‘ गौरीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
डॉ. गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली असून या प्रकरणात गौरीच्या आईने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. तपासाच्या घडामोडींबाबत आणि आरोपांवरून चर्चा सुरू असताना, “या प्रकरणावर तुम्ही पंकजा मुंडेंशी संपर्क केला का?” असा सवाल विचारला असता त्यांनी भावनिक होत संतप्त प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या,“आम्ही त्यांच्याशी संपर्क का करावा? आमचं लेकरू गेलंय. तुम्हाला मुलगा जवळचा की सून? यावर मला काहीच बोलायचं नाही… पण माझ्या लेकराला मारलं. मला न्याय पाहिजे. मला या तिघांना शिक्षा झालेली बघायची आहे. मी एकालाही सोडणार नाही.”
गौरीच्या मृत्यूबाबत तिच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला आहे. अनंत गर्जे, त्याचा भाऊ अजय गर्जे आणि नणंद शीतल आंधळे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी कायम ठेवली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून गौरीच्या मृत्यूमागील कारणांबाबत अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत.
डॉ. गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यूप्रकरणात कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली असताना, गौरीच्या आईने आता थेट आत्महत्येचा इशारा दिला आहे. “ तुमची पुढील भूमिका काय असेल?” असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या: “आज मी पत्रकार परिषद घेणार आहे. पुढची भूमिका उद्या किंवा परवा ठरवणार आहे. जर माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही, तर मी वरळी पोलीस ठाण्याबाहेर फाशी घेणार आहे.” पण त्यांच्या प्रतिक्रियांमुळे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
“अनंत गर्जे खूप खोटं बोलतो. माझं लेकरू गेलं… आता मी तरी जगून काय करू? तू खरं बोललास तर तुला माफ करेन, पण तू खरं बोल. मला खोटं बोलणारे आवडत नाहीत. हा भामटा वकील लावून खोटं बोलतो.” गौरीच्या आईने केलेल्या या गंभीर टिप्पणींनी प्रकरणात भावनिक आणि नाट्यमय वळण आले आहे. दरम्यान, गौरीच्या मृत्यूमागील कारणांचा तपास सुरू असून आरोपांच्या अनुषंगाने पोलीस पुढील पुरावे व माहिती गोळा करत आहेत.






