संग्रहित फोटो
कुर्डुवाडी : तुला खुर्ची कशाला लागते म्हणून सुनेने सासूला शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली व जाब विचारणाऱ्या सासऱ्यालाही सुनेच्या भावाने शिवीगाळ केली तर सुनेने सासऱ्यालाही काठीने मारले. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास डोनवाडीवस्ती पिंपळनेर (ता. माढा) यथे घडली. याबाबत सासरे रामचंद्र संभाजी लोंढे (वय ८६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सून चैत्राली लोंढे व सूनेचा भाऊ जय गडकर यांच्यावर कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा मुलगा अमोल लोंढे हा एक वर्षापूर्वी मयत झाला आहे. सुनेचा भाऊ जय बाबुराव गडकर (रा. तुगाव जि. लातुर) हा बहिणीला भेटण्याकरिता मंगळवारी फिर्यादीच्या घरी आला होता. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास फिर्यादीची पत्नी केशर ही नाष्टा करण्यासाठी खुर्ची घरात घेऊन जात असताना सुन चैत्राली हीने तुला खुर्ची कशाला लागते असे म्हणून शिवीगाळ करत लाकडी काठीने डाव्या दंडावर व उजव्या बरगडीवर मारून जखमी केले. त्यावेळी फिर्यादी सासरे रामचंद्र यांनी केशरला का मारले असे सुनेला विचारले असता सासरे रामचंद्र यांचा मोबाइल हिसकावून घेत सुन चैत्राली व तिचा भाऊ जय गडकर यांनी शिवीगाळ करुन सुन चैत्रालीने सासरे रामचंद्र यांना पाठीत व डाव्या पायावर मारुन जखमी केले.