पंढरपूर पोलिसांची मोठी कारवाई (फोटो- टीम नवराष्ट)
पंढरपूर: अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात पोलीस प्रशासनाने धडक मोहिम हाती घेतली आहे. पोलीस प्रशासनाच्या पथकास मौजे गुरसाळे व मौजे शेळवे ता.पंढरपूर येथील भिमा नदी पात्रात जे.सी.बी. साहयाने अवैधरीत्या वाळू उपसा करुन वाहतुक करताना निदर्शनास आले असता सदर ठिकाणच्या विविध वाहनांवर कारवाई करुन 50 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे.
गुरसाळेत 58 लाख 80 हजार तर शेळवेत 67 लाख 8 हजार रुपये असा एकूण 1 कोटी 25 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली.पोलीस प्रशासनास दिनांक 17 नोव्हें रोजी मौजे गुरसाळे ता. पंढरपूर येथील भिमा नदीचे पात्रात चोरुन जे.सी.बी. च्या साहयाने वाळू उपशा करुन टिपर व ट्रॅक्टरच्या साहयाने वाहतुक करीत असलेबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथील पोलीस पथकाने प्रत्यक्ष जावून खात्री केली असता सदर ठिकाणी विविध वाहनांव्दारे वाळू चोरी करताना निदर्शनास आल्याने कारवाई करण्यात आली.
येथील कारवाईत एक जे.सी.बी., दोन टिपर, एक टेम्पो, दोन ट्रॅक्टर , एक मोटारसायकल तसेच 25 ब्रास वाळू असा एकुण 58 लाख 80 हजार रुपयांचा मुदद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी गुरसाळे येथील कारवाईत सोमनाथ गणतत शिरतोडे, पंकज कोळेकर, विनोद कोळेकर, विनोद चव्हाण, वैभव कोळेकर, समधान चव्हाण, अतुल अनुरथ पवार, सौदागर अभिमान शिंदे व इतर तीन ते चार इसमावर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुरन 824/2025 भा.न्या.सं. कलम 303 (2),132(3) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दिनांक 18 नोव्हें रोजी मौजे शेळवे येथील भिमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा व वाहतुक सुरु असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले असता सदर कारवाई करवाई करुन एक जे.सी.बी., दोन टिपर व अंदाजे २५ ब्रास वाळू असा एकुण 67 लाख 8 हजार रुपये किमतीचा मुदद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर ठिकाणी कारवाई करीत असताना पोलीस कॉस्टेबल दिगंबर भंडारवाड यांना धक्काबुकी करून बळाचा वापर करुन पळून गेले आहेत.
शेळवे येथील अवैध वाळू उपसा व वाहतुक कारवाई विकास उत्तम बागल, तुकाराम गाजरे, बापू नागटिळक, तानाजी पवार व इतर तीन ते चार इसमावर शासकीय कामात अडथळा आणल्याने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणेस गुरन 380/2025 भा.न्या.सं. कलम 305 (ई), 132,221,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डगळे यांनी दिली. सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, ,अपर पोलीस अधिक्षक, प्रितम यावलकर, मार्गदर्शनाखाली पो.ह. निलेश रोंगे, पो.ह. महेश कांबळे, पो. कॉ. दिगंबर भंडारवाड, पो.कॉ शिवशंकर हुलजंती, पो.कॉ. राहुल लोंढे, पो.कॉ विनोद शिंदे, पो.कॉ वैभव घायाळ यांनी पार पाडलेली आहे.






