चिपळुणात दोन दिवसांत 'पोक्सो'चे दोन गंभीर गुन्हे! (Photo Credit- X)
चिपळूण: चिपळूण शहरात अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत दोन गंभीर गुन्हे दाखल झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा पहिला गंभीर प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी रत्नागिरीतील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
आरोपी आदित्य समीर बने (वय २५) आणि पीडित तरुणी साडेसतरा वर्षांची असल्यापासून प्रेमसंबंधात होते. आदित्यने तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, त्यानंतर काही महिन्यांत आदित्य सावंतवाडीला कामानिमित्त गेला. तिथे त्याने दुसऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध जुळवून तिच्याशी विवाह केला. पीडित तरुणीने लग्नाबद्दल विचारणा केल्यावर तो टाळाटाळ करू लागला.
लग्नाचे आमिष दाखवून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपी आदित्य बने याच्यावर पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Latur Crime News:’कायमचं एकत्र राहण्यासाठी…’; लातूरमध्ये प्रेमी युगुलाने उचललं टोकाचं पाऊल
याच संशयित आरोपी आदित्य समीर बने याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील एका मायक्रो फायनान्स कंपनीत कर्ज वसुलीचे काम करणाऱ्या आदित्यने कर्जवसुलीच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेतला. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने कंपनीकडून कर्ज घेतल्यामुळे आदित्यचे त्यांच्या घरी वारंवार येणे-जाणे होते. या ओळखीचा गैरवापर करून त्याने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणीही आरोपी आदित्य बने याच्यावर ‘पोक्सो’ कायद्यासह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (ऍट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून खेड न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
एकापाठोपाठ घडलेल्या या दोन्ही गंभीर गुन्ह्यांमुळे संपूर्ण चिपळूण शहरात तीव्र संतापाची भावना पसरली आहे. यापूर्वी बुधवारी, विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात ने-आण करणाऱ्या व्हॅनचा चालक वहाब वावेकर यानेही एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती. त्या प्रकरणीही ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. अवघ्या काही दिवसांत घडलेल्या या गंभीर गुन्ह्यांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्यक्तींकडूनच असे घृणास्पद कृत्य घडत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
वहिनीनेच दीराला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं! गुप्त कॅमेराने व्हिडिओ करून 10 लाखांची खंडणी मागितली