सौजन्य - नवराष्ट्र टीम
बेशिस्त वाहन चालकांवर गुन्हा दाखल करणार
भिगवण ते शेटफळगढे या रस्त्यावर ट्रॅक्टर वाहतूक चालकांना शिस्त लावण्यासाठी भिगवण पोलिसांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. मदनवाडी येथील घाटात बारा ते तेरा ट्रॅक्टरवर कारवाई केलीच; पण अन्य ट्रॅक्टर वाहतुकीवर नियंत्रण देखील करणार आहेत. वाहतुकीचे सर्व नियम पाळत वाहन चालवणे बंधनकारक आहे. बेशिस्तपणे वाहन चालवत आढळल्यास त्याच्यावरती दंडात्मक तसेच कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे महांगडे यांनी सांगितले आहे.
भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महांगडे, पोलीस उपनिरीक्षक खाडे, महेश उगले, गणेश करचे, पोलीस हवालदार सूर्यवंशी, साबळे, महिला पोलीस हवालदार भोंग, पोलीस कॉ पवार, आप्पा भांडवलकर या कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.
या गोष्टींची होणार तपासणी
चालकांना चारित्र्य प्रमाणपत्र कार्यालयात जमा करणे, वाहनाचा विमा, परवाना, आधारकार्ड आदी कागदपत्रे सोबत ठेवणे, दारू पिऊन वाहन न चालविणे, तसेच वाहन बिघाड झाल्यास मार्गाच्या कडेला थांबवून टायरला स्टॉपर लावणे अशा महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. चालत्या वाहनांवर मोठ्या आवाजात गाणी वाजवू नयेत आणि गरज भासल्यास डायल 112 वर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय वाहतूक सुरक्षिततेसाठी वाहनांच्या पुढील व मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे, त्यावर कारखान्याचे नाव, चालकाचा संपर्क क्रमांक आणि रक्तगट नमूद करणे. तसेच चालकांनी रिफ्लेक्टर जॅकेटचा वापर करावा, असेही निर्देश देण्यात आले.






