संग्रहित फोटो
पुणे : कोरेगाव पार्क परिसरात आलेल्या एका व्यक्तीला अडवून त्याला कारवाईचा धाक दाखवत पोलिसांनी तीनवेळा पैसे उकळले. पुढे काही अंतर आल्यानंतर सुरू असलेल्या नाकाबंदीत अडकण्याच्या भितीने त्याने गाडी वेगात बॅरीकेटला धडकून पळवली. त्यात एक महिला पोलिस हवालदार जखमी झाल्या. यानंतर त्याला पकडले. तेव्हा चौकशीतून खंडणी उकळण्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलिस की, खंडणीखोर असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या पोलिसांवर कारवाई केली असून, त्यांना “देय वार्षिक वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणामकारण राहणार नाही, अशा रितीने एक वर्ष कालावधीसाठी रोखण्यात येत आहे” अशी शिक्षा सुनावली आहे. शासकीय कर्तव्य बजावत असताना, पोलीस दलाची प्रतिमा मलीन करुन शिस्तीचे उल्लंघन करणारे अशोभनीय असे बेशिस्त, बेपर्वा, बेजबाबदारपणा व निष्काळजीपणाचे गैरवर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सहायक निरीक्षक स्वप्निल उत्तम नेवसे (नेमणूक विशेष शाखा), पोलीस हवालदार सुहास भिमराव धाडगुडे (नेमणूक लष्कर पोलीस ठाणे), पोलीस हवालदार प्रकाश दादासो कट्टे (नेमणूक, फरासखाना पोलीस ठाणे), पोलीस अंमलदार सचिन कल्याण वाघमोडे (नेमणूक विश्रामबाग पोलीस ठाणे) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ही घटना नायडु हॉस्पिटल लेनमध्ये एआयएसएसएमएस कॉलेज समोर वेलेस्ली रोड येथे ९ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास घडली होती.
माळालेल्या माहितीनुसार, नाकाबंदीच्या वेळी ड्रंक अॅन्ड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. जहांगीर चौकाकडून आलेल्या एका कारचालकाने बॅरीकेटला धडक देऊन तेथे कर्तव्यास असलेल्या महिला पोलीस हवालदार दीपमाला नायर यांना ५० ते ६० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अर्णव सिंघलला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करून त्याचा जबाब पोलिसांनी नोंदविला. त्यात सिंघलने सांगितले की, कोरेगाव पार्कमधील नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांनी त्याच्याकडून ५ हजार रुपये घेतले. तसेच त्याच दिवशी लेन नं. ७ येथे पब्लीक पब येथे जाताना पबपासून काही अंतर थांबलो असताना तेथे एक टोव्हिंग व्हॅनवरील वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगमध्ये गाडी असल्याने १० हजार रुपये भरण्यास सांगून अडीच हजार रुपये घेतले.
तर ९ डिसेंबर २०२४ रोजी रात्री एकच्या सुमारास घरी जाताना नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांनी ब्रेथ अॅनालायाझर चेकिंग केली, त्यात अल्कोहोल नसल्याचे दिसून आले. तरीही ‘तुम सब दारू पिये हो’, असे बोलून त्यांच्याकडून ५ हजार रुपये घेतले होते, अशी माहिती त्याने दिली. त्यामुळे सिंघल यांनी चौथ्यावेळेस नाकाबंदीतून वाचण्यासाठी गाडी सुसाट चालवली. पण तेव्हा त्यांनी एका महिला अंमलदाराला उडविले.
कॅमेर्याच्या नजरेतून दुर, तोंडाला मास्क
नाकाबंदीत कारवाईच्या धाकाने खंडणी उकळण्यासाठी पोलिस चांगलीच मेहनत घेत असल्याचे दिसून आले आहे. पैसे घेताना आपण कॅमेर्यात येऊ नये म्हणून पुरेपूर काळजी घेत होते. तसेच उद्या एखाद्याने तक्रार केली तर आपला चेहरा ओळखता येऊ नये म्हणून तोंडाला मास्क देखील लावत असे. त्यांचे हे वर्तन अक्षेपार्ह आणि संशयास्पद असल्याचे पोलिस आयुक्तांच्या आदेशात म्हंटले आहे.